गडचिरोली : जिल्ह्याच्या विविध रूग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, शेतकऱ्यांच्या धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा आदीसह विविध मागण्यांसाठी स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने मंगळवारपासून येथील इंदिरा गांधी चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्ष तथा जि.प. सदस्य छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात उपोषणाच्या पहिल्या दिवशी छाया कुंभारे यांच्यासह जि.प. सदस्य सुनंदा आतला, सुषमा राऊत, सुशिला जयसिंगपुरे, कालिंदा कडवे आदी आमरण उपोषणाला बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नऊ महिला उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांची भर पडली. यामध्ये महानंदा दादाजी राऊत, लता हेमंत कन्नाके, मीना रेशीम नाकाडे, निर्मला रामदास कोडाप, ममिता एस. आळे, भूमिका सहारे, वैशाली विजय कोडापे, प्रमिला रामदास कोडापे, कविता पुरूषोत्तम पुराम, लीलाबाई नेवारे आदींचा समावेश आहे. २०११-१२ मध्ये झालेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी जाहीर करण्यात यावी, गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी, गडचिरोली शहरात महिला व बाल रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पदे भरून रूग्णालय सुरू करण्यात यावे आदी मागण्या आहेत.
१५ महिला उपोषणावर
By admin | Updated: May 14, 2015 01:27 IST