महिला मजुरांची उपस्थिती : आरमोरी तालुक्यात रोहयोची कामे जोरातआरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर ९३ व यंत्रणा स्तरावर ४२ अशी एकूण १३५ कामे सुरू आहेत. या कामावर महिला व पुरूष मिळून एकूण ८ हजार २१४ मजुरांची उपस्थिती आहे. आरमोरी तालुक्यात रोहयोच्या कामाने वेग घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीत नोंदणीकृत मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.आधीच दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकरी, शेतमजूर रोजगारासाठी भटकंती करीत होते. दरम्यान रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी तालुक्यातील प्रत्येक गावातून वाढली. आरमोरी तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत गावातील नोंदणीकृत मजुरांनी नमूना क्र. ४ चा फार्म भरून ग्रामपंचायत प्रशासनाकडे रोहयोच्या कामाची मागणी केली. मजुरांच्या मागणीनुसार प्रशासनाने कामाचे नियोजन करून ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर विविध प्रकारचे कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात ५ मार्चपर्यंत ग्रामपंचायतस्तरावर रोहयोची एकूण ९३ कामे सुरू करण्यात आली असून यावर ६ हजार २२६ मजूर काम करीत आहेत. यामध्ये पांदन रस्त्याच्या १६ कामावर ४ हजार ३८७ मजूर भातखाचरच्या ७ कामांवर ६३३, मजगीच्या ५ कामावर २९७, बोडीच्या ४ कामांवर ३७७, शेततळ्याच्या २ कामांवर ४१, सिंचन विहिरीचया ४९ कामावर ४४२, घरकुलाच्या ८ कामावर ३३, मामा तलावाच्या एका कामावर १० मजूर, राजीव गांधी भवनाच्या एका कामावर ६ असे एकूण ग्रा. पं. स्तरावरील ९३ कामावर एकूण ६ हजार २२६ महिला व पुरूष मजूर उपस्थित आहेत. यंत्रणास्तरावर ५० टक्क्यानुसार एकूण ४२ कामे सुरू आहेत. या कामावर ९८३ महिला व १ हजार ५ पुरूष असे एकूण १ हजार ९८८ मजूर काम करीत आहेत. यंत्रणास्तरावरील कामांमध्ये सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र कार्यालय, जि.प. बांधकाम उपविभाग वडसा, सिंचाई, तालुका कृषी आदी विभागाद्वारे वृक्ष लागवड, रोपवन, खोदतळे, शेततळे, बोडी, रोपवाटिका, बंधारा, वनतलाव व भूमिगत बंधाऱ्यांच्या कामांचा समावेश आहे. रोहयोच्या कामावर महिला मजुरांची उपस्थिती लक्षणीय आहे. (वार्ताहर)
१३५ कामावर ८ हजार २१४ मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 01:01 IST