चामोर्शी तालुक्यातील विष्णुपूर गावात अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. तसेच नजीकच्या कर्कापल्ली येथेसुद्धा अवैध दारूविक्री सुरू आहे. याबाबतची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त मोहीम राबवित विष्णुपूर-कर्कापल्ली जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, जंगल परिसरात विविध ठिकाणी हातभट्टी लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हातभट्ट्या नष्ट करीत चार ठिकाणाहून ८५ हजार रुपये किमतीचा १३ ड्रम मोहसडवा व साहित्य नष्ट केले. याप्रकरणी एका अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस प्रशासनातर्फे अवैध दारूविक्रेत्यांविरोधात वारंवार कारवाई केली जात असल्याने विष्णुपूर येथील ५० टक्के अवैध दारूविक्री बंद झाली हाेती. परंतु काही दारूविक्रेत्यांनी पुन्हा डाेके वर काढले आहे. १२ मे राेजीची कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, बिट अंमलदार नारायण वाकुडकर, वासुदेव कोडापे व मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे यांनी केली.