लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली, अद्यापही ११ मार्ग बंद आहेत. नद्यांचा प्रवाह वाढला असून तलावदेखील ओव्हरफ्लो झाले आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या भामरागडमध्ये शिरलेले पाणी ओसरले; पण पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुका मुख्यालयाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेलाच आहे.
भामरागड शहराला १९ ऑगस्टला पुराचा वेढा पडला होता. मुख्य बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकाने व घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. २० ऑगस्टला दुपारनंतर बाजारपेठेतील पाणी ओसरले. परिसरात साचलेला गाळ व इतर साहित्य हटवून साफसफाई करण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. तथापि, पर्लकोटा नदीवरील जुना पूल अद्यापही पाण्याखाली आहे. त्यामुळे भामरागडसह परिसरातील ७० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेलाच आहे.
आरोग्य सेविकेला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरभामरागड तालुक्यातीला आरेवाडा येथील आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती २० ऑगस्ट रोजी अचानक खालावली. त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता होती. जि.प. सीईओ सुहास गाडे यांनी माहिती देताच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलिस दलाचे पवन हंस हेलिकॉप्टर भामरागडला पाठविले. सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.