अहेरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अहेरी पंचायत समितीमध्ये एकूण १ हजार ४२५ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या घरकुलांचा तालुक्यातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर करण्यात आलेल्या १ हजार ४२५ घरकुलांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी १ हजार २७१, अनुसूचित जातीसाठी ६०, इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३३ व अतिरिक्त ६१ घरकुलांचा समावेश आहे. मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांमध्ये कमलापूर गावात ६३ घरकुलांचा समावेश आहे. महागाव (खु.) येथे १९५ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. देचली ९४, वेलगूर ५२, दामरंचा १८५, आलापल्ली १०९, जिमलगट्टा १७०, देवलमरी १४८, किष्टापूर १९९, राजपुरपॅच ५६, मरपल्ली ७, पेटा २६, गोविंदगाव २१, वांगेपल्ली ७, खमनचेरू ३, महागाव (बु.) ८ व उमानूर गावासाठी १७ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. अतिरिक्त ६१ घरकूल आवश्यक असलेल्या गावांमध्ये बांधून देण्यात येणार आहे. घरकुलाची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर प्रसिध्द करून गावातील नागरिकांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन या घरकूल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी यांनी केले आहे. घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा, घर टॅक्स पावती, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, गाव नमुना ८ अ व जागेचे प्रमाणपत्र तसेच पासबुकाची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रांची ८ दिवसात पूर्तता करून पं.स.ला सादर करावे, असे आवाहन संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
१ हजार ४२५ घरकुले मंजूर
By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST