माद्रिद : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लबला सोडचिठ्ठी देणार, अशा चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तो स्पेनच्या बाहेरील लीगमध्ये खेळणार असल्याच्या नवीन चर्चांना उधाण आले आहे. त्याचे नाव मँचेस्टर सिटी आणि पॅरिस सेंट जर्मेन क्लबसोबत जोडले जात आहे. जानेवारीत सुरू होणाऱ्या ट्रान्सफर विंडोत पुन्हा एकदा मेस्सीच्या नावाची चर्चा रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देऊन युव्हेंटसचा हात पकडल्यानंतर मेस्सीही स्पेनबाहेरील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
रोनाल्डोने रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळण्याचा निर्णय घेत जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. रोनाल्डोने माद्रिदसोबत अनेक अविश्वसनीय विजय मिळवले होते. मात्र, तरीही त्याने माद्रिदला सोडचिठ्ठी दिली. रोनाल्डोच्या या निर्णयानंतर मेस्सीही इटलीत खेळू शकतो, असा दावा फिफा एजंट अलेसिओ सुंडॅस यांनी केला आहे.
2000 मध्ये 13 वर्षांचा मेस्सी बार्सिलोना क्लबमध्ये दाखल झाला होता. त्याने या क्लबकडून सर्वाधिक 607 गोल केले आहेत. तसेच त्याने पाच वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कारही जिंकला आहे. बार्सिलोनाने नुकताच त्याच्यासोबतचा करार जून 2021 पर्यंत वाढवला आहे.