तुरीन - रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंट्सकडून पहिला सामना केव्हा खेळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लवकरच रोनाल्डो मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर हुकूमत गाजवताना दिसणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर रजेवर गेलेला रोनाल्डो नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुरीन येथे दाखल झाला. त्याने खासगी विमानाने दिमाखात तुरीनमध्ये एन्ट्री केली. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते विमानतळाबाहेरील सुरक्षा भिंतीवर बसले होते.
सलग तीन चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकून दिल्यानंतर रोनाल्डोने माद्रिद सोडण्याचा निर्णय धक्कादायक होता. युव्हेंट्स क्लबने जवळपास 800 कोटी डॉलर रक्कम मोजून रोनाल्डोला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पोर्तुगालला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत उरूग्वेकडून पराभव पत्करावा लागल्यापासून रोनाल्डो कुटूंबीयांसोबत रजेवर गेला होता. मात्र आता तो युव्हेट्सच्या सराव सत्रात सहभागी होण्यासाठी तुरीनमध्ये दाखल झाला. यावेळी 33 वर्षीय रोनाल्डोसह गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीगेजही उपस्थित होती.
नायकेच्या प्रमोशनसाठी रोनाल्डोने नुकताच चीन दौरा केला. बॅलोन डी ओर पुरस्कारावर पाच वेळा दावा सांगणारा हा खेळाडू प्रचंड आत्मविश्वासाने तुरीनमध्ये आला. नव्या सहका-यांसोबत खेळण्यासाठी तो उत्सुक दिसला. आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक स्पर्धेत युव्हेंट्स क्लब 4 ऑगस्टला पहिला सामना खेळणार आहे, परंतु त्यात रोनाल्डोचा समावेश नसणार आहे. मात्र चाहत्यांसाठी खूशखबर अशी आहे की 19 ऑगस्टला सीरि A लीगच्या सलामीच्या लढतीत रोनाल्डो चिएव्हो क्लबविरूद्घ खेळण्याची शक्यता आहे.