यंदा गौरींसोबत द्या नव्या खाऊची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:31 PM2017-08-23T19:31:58+5:302017-08-23T20:22:56+5:30

गौराईंसाठी पंचपक्वानासोबतच फराळाचे पदार्थही आवर्जून बनवले जातात. हे फराळाचे पदार्थ म्हणजे गौराईची शिदोरी. यंदा या शिदोरीत नव्या चवीच्या, हटके पदार्थांची भर घातली तर..!

Try new tasty dishes for Gauri Ganpati. It's realy difrent and delicious | यंदा गौरींसोबत द्या नव्या खाऊची शिदोरी

यंदा गौरींसोबत द्या नव्या खाऊची शिदोरी

googlenewsNext
ठळक मुद्दे* ओट्सची खीर. झटपट तयार होणारी आणि पौष्टिक खीर गौरींसाठीच्या नैवेद्यासाठीही छान पर्याय आहे. या खिरीत सफरचंद देखील घातलं जातं. त्यामुळे खीरीच्या पौष्टिकतेत आणखी भरच पडते.* थट्टाई . दक्षिण भारतातील हा एक चवदार पदार्थ आहे.. दिवाळीत हा पदार्थ केला जातो. आपण खारे शंकरपाळे करतो त्याच प्रकारचा हा एक पदार्थ आहे. आपण गौरींच्या फराळाकरिता तो बनवू शकतो.* गौरी-गणपती असोत किंवा दसरा-दिवाळी, नैवेद्याच्या ताटात आपण मसाला भाताची मूद हमखास ठेवतोच, याच मसाले भाताला हेल्दी करण्यासाठी जवसाचा भात करून बघा.

 



-सारिका पूरकर-गुजराथी


अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत श्री गणरायांच्या आगमनाबरोबरच भाद्रपद षष्टीला सोनपावलांनी गौरींचं आगमन होईल. त्यांच्या आशीर्वादानं सुख-समृद्धी, धन-धान्य यांची बरसात घराघरात होईल. सारं घर कसं चैतन्यानं न्हाऊन निघेल. मनमोहक आरास, गौरींसाठी नव्या साड्या-दागिने, रोषणाई हे सारं करण्यात आता सारेच मग्न झाले आहेत. माहेरी आलेल्या या गौरींचा पाहुणचाराची तयारी करण्यात महिलाही आता गढून गेल्या आहेत. दरवर्षी गौरींच्या आगमनाच्या दुस-या दिवशी त्यांना पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. पारंपरिक पदार्थांचा समावेश यात असतो. सोळा भाज्या, पुरणपोळी, भजी-वडे, कोशिंबिरी असा साग्र-संगीताचा थाट या नैवेद्याला असतो. त्याचबरोबर गौराईंंसमोर फराळाचे पदार्थही आकर्षकरित्या सजवून मांडले जातात. जेणेकरु न माहेरून निघताना या खाऊची शिदोरी तिच्याबरोबर राहावी. तर गौराईंच्या याच नैवेद्यात, फराळाच्या पदार्थांच्या चवीत काही टेस्टी बदल केले तर ? परंपरांना धक्का न देता आहे त्याच पदार्थांना थोडा हटके टच दिला तर नक्कीच हा नैवेद्य आणि फराळही गौराईला आणि ती लेकूरवाळी असेल तर तिच्या बाळांनाही नक्की आवडेल!

 

1)

ओट्सची खीर

खीर हा कोणत्याही नैवेद्यातील एक प्रमुख पदार्थ आहे. आपण एरवी रवा, तांदळाची कणी, शेवयी, गव्हाचा भरडा यांची खीर करतो. मात्र याच खिरींच्या यादीत आता ओट्सची खीर हा प्रकार समाविष्ट करून पाहा. झटपट तयार होणारी आणि पौष्टिक खीर गौरींसाठीच्या नैवेद्यासाठीही छान पर्याय आहे. या खिरीत सफरचंद देखील घातलं जातं. त्यामुळे खीरीच्या पौष्टिकतेत आणखी भरच पडते. साजूक तुपात किसलेलं सफरचंद घालून मंद आचेवर परतून घ्यावं. त्यात अगदी थोडं पाणी घालून सफरचंद मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर यात आटवलेलं दूध, साखर, काजू-बदामाचे तुकडे आणि ओट्स घालून 5-7 मिनिटं शिजवून घ्यावं. नंतर त्यात वेलची पावडर घालावी. खीरीचं दूध मध्यमच आटवावं. दूध जास्त पातळ नको वा जास्त घट्टही नको. कारण ओट्स शिजल्यानंतर खीर घट्ट होते.

 


 

2) थट्टाई
दक्षिण भारतातील हा एक चवदार पदार्थ आहे.. दिवाळीत हा पदार्थ केला जातो. आपण खारे शंकरपाळे करतो त्याच प्रकारचा हा एक पदार्थ आहे. आपण गौरींच्या फराळाकरिता तो बनवू शकतो. उडीद डाळ, शेंगदाणे, फुटाण्याच्या डाळ्या, तीळ, यांची बारीक पूड करु न तांदळाच्या पीठात मिक्स करावी. यातच तिखट, हिंग, मीठ, चिरलेला कढीपत्ता, तेलाचं मोहन घालावं. यात भिजवलेली आणि पूर्ण निथळलेली हरबरा डाळ घालावी. डाळ घालताना ती भरडून घेतली तरी चालेल. मग घट्ट मळून घेऊन त्याच्या लहान लहान पु-या लाटून मंद आचेवर तेलात गुलाबीसर तळून घ्याव्यात. पु-या पूर्णपणे गार झाल्यावरच डब्ब्यात भराव्यात. या पु-याअत्यंत खुसखुशीत लागतात. नेहेमीच्या शंकरपाळ्यांना या पु-याचांगला पर्याय आहे.

 

3) जवसाचा भात

गौरी-गणपती असोत किंवा दसरा-दिवाळी, नैवेद्याच्या ताटात आपण मसाला भाताची मूद हमखास ठेवतोच, याच मसाले भाताला हेल्दी करण्यासाठी हा प्रकार करु न पाहावा. 2 चमचे तीळ, 3 चमचे जवस, 1 चमचा टरबूजाच्या बिया ( नसल्या तरी चालतील), काळी मिरी, लवंग, दालचिनी, जिरे, खोबरे, साबूत लाल मिरची वाटून पूड करावी. तांदूळ भिजवून निथळून घ्यावेत. नेहमीप्रमाणे साजूक तूपात तेजपान,कढीपत्ता, हिंगाची फोडणी करून त्यात हिरवे मटार, फरसबी, गाजराचे तुकडे घालून परतून झाले की बारीक केलेली पूड घालून परतावं. तांदूळ घालून ते पुन्हा चांगलं परतून चवीला मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. वरून तळलेले काजू, कोथिंबीर पेरावी. एरवी जवस खायला अनेकजण नाक मुरडतात, पण यानिमित्तान ं गौरींबरोबरच सर्वांनाच पौष्टिक नैवेद्याचा लाभ होईल.

 

 

4) गोकुलपीठा

हा एक बंगाली पारंपरिक पदार्थ आहे. भरपूर पौष्टिक आणि करायला अगदी सोपा असा प्रकार असल्यामुळे गौरींच्या नैवेद्यासाठी करून पाहायला काहीच हरकत नाही. खवा भाजून घेऊन त्यात भाजलेल्या खोब-याची पूड, साखर घालून मळून त्याचे पेढे करु न घ्यावेत. साखरेचा एकतारी पाक करु न बाजूला ठेवावा. नंतर गव्हाचं पीठ, खायचा सोडा आणि दूध घालून घट्ट भज्यांसारखं पीठ तयार करावं. यात आता खवा-नारळाचे पेढे बुडवून तूपात मंद आचेवर तळून लगेच पाकात घालावेत आणि ते तासभर तसेच राहू द्यावेत. नंतर गोकुळपीठा बदामाचे काप घालून नैवेद्याला ठेवावेत. बंगालमध्ये मकरसंक्र ांतीला हा पदार्थ बनवला जातो.
 

 

5) खुजराची साटोरी
साटोरी हा तर महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ. खवा-रव्याची साटोरी नेहमीच केली जाते. पण याच साटोरीचा मेकओव्हर करु न त्याला हेल्दी टच देता येईल. काळे खजूर बिया काढून मिक्सरमधून काढून घ्यावेत. त्याची एकजीव पेस्ट करावी, यात आता भाजलेलं खोबरं आणि खसखशीची पूड मिक्स करु न सारण बनवावं. यात सुकामेव्यांची भरडही घालता येईल. कणकेत तूपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवून त्याची पुरी लाटून खजुराचे सारण भरावं. आणि लाटलेली साटोरी साजूक तूपावर शेकून अथवा तळून घ्यावी.

 

Web Title: Try new tasty dishes for Gauri Ganpati. It's realy difrent and delicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.