- शालिनी सिन्नरकर दो वक़्त की रोटी के लिए इन्सान ना जाने क्या क्या करता है! फिलॉसॉफिकल वाटलं हे वाक्य तरीही आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच निघून जातं हे काही खोटं नाही! किती त्या भाकरीचे तरी भगिनीभाव. पोळी-चपाती-रोटी-नान-कुलचा-पराठा-परोंठा.. संपूर्ण भारतीय उपखंडातच ती रंगरूप बदलते, धान्य बदलते. शेकण्याचे-भाजण्याचे प्रकार आणि आकारही बदलतात; पण जेवणात यापैकी एक काहीतरी तर हवंच. त्याशिवाय पाेट भरत नाही.
आता अचानक या सगळ्यांची चर्चा म्हणजे टेस्ट ॲटलास नावाच्या एका चवीढवीच्या रँकिंगनुसार ‘बटर गार्लिक नान’ हा जगातला सगळ्यात चांगला, नंबर एक पसंतीचा ब्रेड ठरला आहे. नानला म्हणे फ्लपी ब्रेड असंही म्हणतात इंग्रजीत.
आता नान म्हणजे ब्रेड कसा असाही प्रश्न पडला असेल तर जगाभरातल्या उत्तम ब्रेडच्या यादीत प्रथम क्रमांकावर नान, दुसऱ्या क्रमांकावर अमृतसरी कुलचा आणि सहाव्या क्रमांकावर दक्षिणी ‘परोंटा’ आहे. पुढे यादीत रोटीनंही नाव मिळवलं आहे.
जगभरात भारतीय रेस्टॉरंट उभे राहत असताना आणि भारतीय अन्नाचा प्रसार होत असताना भारतीय ‘ब्रेड’ अर्थात नान ते भाकरी हे सारेच लोकप्रिय होत आहेत.काही फूड ब्लॉगर अभ्यासकांच्या मते नान हा पर्शियन शब्द, पर्शियातून तो आला. तर काहींच्या मते सिंधू संस्कृतीतही रोट्या होत्या, पिठाचे प्रकार होते. त्यामुळे भारतीय उपखंडात रोटी ही अत्यंत प्राचीन गोष्ट आहे. पुढे मुघल काळात तंदूर तंत्राने नान जास्त केले जाऊ लागले आणि ते लोकप्रियही झाले.
भारतातही काश्मीर ते तामिळनाडू नान-रोट्या-कुलचे-फुलके-पराठे-भाकरी-दशम्या-परोटे.. राज्याप्रमाणे नावं बदलतात, धान्य बदलतं आणि करण्याच्या पद्धतीही. नव्या काळात कार्ब कमी खा, पोळ्या-भाकऱ्या-रोट्या कमी खा, अशी सतत चर्चा असली तरी आहारात मुख्य स्थान यांचेच आहे. पोटभरीचं जेवण म्हणजे चपात्या-रोट्याच!