'लग्नानंतर होईलच प्रेम' मधून लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट?; 'या' कारणामुळे सोडणार मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:18 IST2026-04-25T10:18:02+5:302026-04-25T10:18:22+5:30
Marathi actress: जर या अभिनेत्रीने मालिका सोडली तर पुन्हा एकदा मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळेल.

'लग्नानंतर होईलच प्रेम' मधून लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट?; 'या' कारणामुळे सोडणार मालिका
छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'लग्नानंतर होईलच प्रेम'. या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. सध्या या मालिकेत काव्यार्थ आणि जीवांदिनी यांच्या आयुष्यात अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहे. मात्र, यामध्येच आता एक लोकप्रिय अभिनेत्री एक्झिट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खलनायिका भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कश्मिरा कुलकर्णी. या मालिकेत तिने साकारलेली रम्या ही भूमिका विशेष लोकप्रिय झाली आहे. सतत जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ यांच्या संसारात अडचण निर्माण करणारी या मालिकेतून काढता पाय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं आहे.
रम्याच्या म्हणजेच कश्मिराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे डॉक्टरांनी तिला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे ती मालिका सोडणार का? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाली आहे. यावर कश्मिराने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
''माझ्या पायाला एसिअल कट आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला सर्जरी सांगितली आहे. सध्या मला सेटवरचे सगळेच सहकारी खूप सपोर्ट करतायेत. मला लागल्यानंतर मी माझे सगळे रिपोर्ट त्यांना पाठवले. तेव्हापासून ते माझी सेटवर विशेष काळजी घेतायेत. मला खासकरुन बसून किंवा उभं राहून डायलॉग्स दिले जातायेत. कारण, मला फार हालचाल करता येत नाही'', असं कश्मिरा म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''मी अजून २ -३ डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. आणि, जर सगळ्यांचं एकच मत झालं तर मी काही काळ ब्रेक घेईन. सर्जरी म्हटलं तर तीन ते साडेतीन महिने मला त्यासाठी द्यावे लागतील.आणि, या सगळ्यासाठी मला टीमला अॅडजेस्ट करायला सांगणं योग्य वाटत नाही.'' दरम्यान, या मालिकेत कश्मिराने उत्तमरित्या रम्याची भूमिका साकारली आहे. रम्यामुळेच या मालिकेत नवनवीन ट्विस्ट घडत असल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे कश्मिराने या भूमिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवली आहे.