“दादरलाच आहात मग...”; समीर चौघुलेंनी घेतली राज ठाकरेंची खास भेट, सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:59 IST2026-04-24T09:59:16+5:302026-04-24T09:59:56+5:30
समीर चौघुले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. समीर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.

“दादरलाच आहात मग...”; समीर चौघुलेंनी घेतली राज ठाकरेंची खास भेट, सांगितला अनुभव
समीर चौघुले हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्रसिद्ध अभिनेते. समीर चौघुलेंना आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये विविध पात्र साकारताना पाहिलंय. समीर चौघुले सध्या वैयक्तिक आयुष्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' कार्यक्रमही करत आहेत. याचनिमित्त समीर चौघुले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. समीर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.
समीर चौघुले लिहितात, ''सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले ..पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता…तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते..माननीय राजसाहेब ठाकरे यांचा - “दादरलाच आहात मग घरी येऊन जा” ….आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम.. आणि हो मी निघताना १०० प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू ..मनापासून आभार साहेब….''
अशाप्रकारे समीर यांनी राज ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. राज ठाकरे यांची अनेक कलाकारांशी मैत्री आहे. समीर चौघुले आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांचे मैत्रीपूर्ण संंबंध आहेत. राज ठाकरे कायमच मराठी कलाकारांच्या आणि मराठी चित्रपटांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. राज ठाकरे आणि समीर चौघुले यांच्या भेटीचा हा अनुभव हेच याचं उदाहरण आहे.