लेकाचं नाव "अक्षोभ्य" ठेवल्याने ट्रोल झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला- "आमच्या घरात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:14 IST2026-04-24T11:14:25+5:302026-04-24T11:14:50+5:30
मोठ्या धुमधडाक्यात बाळाचं बारसं करत त्याने लेकाचं नाव 'अक्षोभ्य' ठेवलं होतं. मुलाचं एवढं कठीण नाव ठेवल्यामुळे अधोक्षजला ट्रोलही करण्यात आलं. आता याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

लेकाचं नाव "अक्षोभ्य" ठेवल्याने ट्रोल झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला- "आमच्या घरात..."
संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता असलेल्या अधोक्षज कऱ्हाडे काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. मोठ्या धुमधडाक्यात बाळाचं बारसं करत त्याने लेकाचं नाव 'अक्षोभ्य' ठेवलं होतं. मुलाचं एवढं कठीण नाव ठेवल्यामुळे अधोक्षजला ट्रोलही करण्यात आलं. आता याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे. बाळाचं नाव 'अक्षोभ्य' का ठेवलं? याशिवाय घरातील सगळ्यांचीच नावं एवढी कठीण का आहेत. यामागचं कारण अधोक्षजने मुलाखतीत सांगितलं आहे.
पुढारीला दिलेल्या मुलाखतीत अधोक्षज म्हणाला, "मी ट्रेंड म्हणून माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलं नाही. हे नाव आजकालच्या ट्रेंडिंग नावांमधील नाही तर आजकालच्या ट्रेंडमध्ये हरवलेल्या, आपल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीतील पौराणिक नाव आहे. ही नावं आजकाल कोणालाही माहित नाहीत. आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे. बालाजीचं प्रमुख स्तोत्र म्हणजे विष्णुसहस्त्रनाम. आमच्या घराण्यातील जी नाव आहेत, म्हणजे वडिलांचे नाव गोविंद, आजोबांचं अनंत, भाऊ संकर्षण, माझं नाव अधोक्षज, संकर्षणच्या मुलांची नाव सर्वज्ञ, स्राग्वी आणि माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य ही सगळी विष्णुसहस्त्रनामातील प्रामुख्याने विष्णूची नावे आहेत".
"जगाला शांतीचे प्रतीक देणारे जे पाच प्रमुख बुद्ध भगवान आहेत. त्यांच्यापैकी एकाचं नाव अक्षोभ्य आहे . माझी आई नेहमी म्हणते की आपल्या मुलाचं नाव घेताना धकाधकीच्या जीवनात नामस्मरण कमी पडतं. त्यामुळे आपल्या मुलांची नावं देवाच्या नावावरून ठेवावी. जेणेकरून त्यांची नावे घेताना आपल्या मुखातून नामस्मरण होईल. भगवंताचं नाव आपल्या तोंडात येईल. कुठलंही नाव अवघड नसतं. आपल्याला ते नाव नीट उच्चारण्याची सवय नसते. आपल्याला स्तोत्र म्हणण्याची सवय नसते. स्तोत्र रोज म्हटलं तरी आपले उच्चार सोपे होतात. स्तोत्र रोज म्हटले तर आपल्याला कोणतच नाव घेणं अवघड वाटणार नाही", असंही त्याने पुढे सांगितलं.