या अभिनेत्याच्या नावामुळे महाभारतमधील अर्जुनने बदलले होते त्याचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:30 IST2020-04-28T17:28:54+5:302020-04-28T17:30:31+5:30

महाभारतात अर्जुनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने या मालिकेच्याआधी त्यांचे नाव बदलून अर्जुन ठेवले होते.

Mahabharat's Arjun Firoz Khan told why did he change his name before serial PSC | या अभिनेत्याच्या नावामुळे महाभारतमधील अर्जुनने बदलले होते त्याचे नाव

या अभिनेत्याच्या नावामुळे महाभारतमधील अर्जुनने बदलले होते त्याचे नाव

ठळक मुद्देनाव बदलण्याविषयी फिरोज यांनी सांगितले की, चोप्रा साहेब आणि डॉक्टर रजा यांनी मला माझे नाव बदलून अर्जुन ठेवण्याविषयी सुचवले. या नावाने मला सगळे काही दिले...

डीडी भारतीवर सुरू झालेल्या महाभारत या मालिकेतील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला महाभारतात अर्जुनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. होय, या अभिनेत्याचे नाव आहे फिरोज खान. पण आता ते अर्जुन याच नावाने ओळखले जातात. याचे कारण फिरोज खान यांनी महाभारताच्या वेळीच आपले नाव बदलून अर्जुन असे ठेवले होते. फिरोज यांनी त्याचे नाव बदलून अर्जुन का ठेवले होते हा एक रंजक किस्सा असून त्यांनीच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

फिरोज खान यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेच्या ऑडिशनविषयी आणि त्यांच्या नाव बदलण्याविषयी सांगितले. ऑडिशनच्या आठवणींविषयी फिरोज यांनी सांगितले की, मी महाभारतसाठी ऑडिशन द्यायला गेलो त्यावेळी तिथे दीपक पराशर, राज बब्बर, गोविंदा यांसारखे कलाकार उपस्थित होते. मला गोविंदाने दोन पानांचे संवाद देऊन ऑडिशन द्यायला सांगितले. मी त्यावर त्याला सांगितले की, तू हिंदीमध्ये संवाद वाच... मी ते इंग्रजी भाषेत लिहून घेतो. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. खरे तर जॅकी श्रॉफ अर्जुनची भूमिका साकारणार होता. पण त्यानंतर मला या भूमिकेसाठी घेण्यात आले. 

नाव बदलण्याविषयी फिरोज यांनी सांगितले की, मी या मालिकेच्या आधी निर्मात्यांना फोन करायचो आणि सांगायचो की मी फिरोज खान बोलत आहे. ते लगेचच माझा फोन घ्यायचे. पण मी प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान नाहीये हे कळल्यावर मला नंतर फोन करायला सांगितले जायचे. यामुळे माझा सतत अपमान होतोय असे मला वाटायला लागले होते. त्यामुळे चोप्रा साहेब आणि डॉक्टर रजा यांनी मला माझे नाव बदलून अर्जुन ठेवण्याविषयी सुचवले. या नावाने मला सगळे काही दिले... या नावामुळेच मला प्रसिद्धी, पैसा मिळाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही... पण माझी आई देखील मला या मालिकेनंतर अर्जुन या नावाने हाक मारायला लागली. 

Web Title: Mahabharat's Arjun Firoz Khan told why did he change his name before serial PSC