'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, लग्नानंतर दीड वर्षांनी होणार बाबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:08 IST2026-04-27T15:08:16+5:302026-04-27T15:08:44+5:30
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता निखिल राजेशिर्के लवकरच बाबा होणार आहे. निखिलने सोशल मीडियावर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, लग्नानंतर दीड वर्षांनी होणार बाबा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता रोहन गुजर नुकताच बाबा झाला आहे. रोहननंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्याच्या घरी पाळणा हलणार आहे. 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता निखिल राजेशिर्के लवकरच बाबा होणार आहे. निखिलने सोशल मीडियावर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी निखिलच्या घरी पाळणा हलणार आहे.
निखिलची पत्नी चैत्राली गरोदर आहे. निखिलने चैत्रालीचे बेबी बंप करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिने हिरव्या रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. फुलांची ज्वेलरी परिधान करत चैत्राली नटली आहे. चैत्रालीच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा ग्लो स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या फोटोंवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. निखिल आणि चैत्राली यांनी २०२४ मध्ये लग्न केलं होतं. आता लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
दरम्यान, निखिलने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवरील तो लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने काही सिनेमांतही काम केलं आहे. सध्या तो 'लक्ष्मी निवास'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.