"चूक झाली तर दोन थोबाडीत मारा, पण...", समय रैनाच्या वादावर कुमार विश्वास यांनी मांडलं रोकठोक मत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:17 IST2026-04-19T15:20:37+5:302026-04-19T16:17:55+5:30
कुमार विश्वास यांनी समय रैनाची घेतली बाजू, म्हणाले...

"चूक झाली तर दोन थोबाडीत मारा, पण...", समय रैनाच्या वादावर कुमार विश्वास यांनी मांडलं रोकठोक मत!
समय रैना हा एक लोकप्रिय भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आहे. जो त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमुळे चर्चेत होता. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमधील काही विनोदांमुळे धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी समय रैना आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांच्याविरोधात देशातील विविध भागांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैनाने नुकतंच नव्या 'स्टिल अलाइव्ह' शोमधून कमबॅक केलं आहे. यातच समय रैनाबद्दल कवी कुमार विश्वास यांनी व्यक्त केलेले मत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
कुमार विश्वास यांनी समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंटच्या (India's Got Latent Show) वादावर भाष्य केलं. 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत कुमार विश्वास म्हणाले की, "समय रैना आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून एखादी चूक झाली असेल, तर त्यांना समजावून सांगायला हवे होते. ती मुलं आहेत, त्यांना दोन थोबाडीत मारा आणि सांगा की असा मूर्खपणा करू नका. पण त्यांच्यावर १५०-२०० एफआयआर (FIR) दाखल करणे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरोधात वक्तव्ये करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्याने काय केलंय? त्याने देशद्रोह केलाय का? की त्याने अणुबॉम्बचा नकाशा शत्रू देशाला विकला आहे?".
कुमार विश्वास पुढे म्हणाले, "जेव्हा एखाद्या चिमुरडीवर बलात्कार होतो, तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या जात नाहीत. पोलीस अधिकारी रस्त्यावर लाच घेतो, तेव्हा तुमची नैतिकता जागी होत नाही. पण कोणातरी धर्माबद्दल, जातीबद्दल किंवा समाजाबद्दल काहीतरी बोललं की लगेच तुम्ही त्यांना मारून टाकण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या देता. आजच्या काळात तुम्ही जातीवर, धर्मावर, अगदी जाड-बारीक असण्यावरही विनोद करू शकत नाही. मग बोलायचे तरी कोणत्या विषयावर?".
दरम्यान, गेल्या वर्षी समयच्या शोबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी कुमार विश्वास यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी कथितपणे रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचे कान टोचले होते. त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं होतं, “अलीकडे एका शोमध्ये खूप घाणेरडं बोललं गेलं. त्या चॅनलने माझ्याशी संपर्क साधला आणि काही मित्रांनीही मला प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, पण शांत राहणंच मला योग्य वाटलं. त्या मुलांपैकी एकाने माझ्यासोबत पॉडकास्ट केलं होतं. तो मला चांगला वाटला आणि तो इतका भावुक झाला की त्याला माझ्यासमोर रडू येत असल्यासारखं वाटत होतं".