सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:07 IST2026-04-15T12:07:36+5:302026-04-15T12:07:58+5:30
दोघांनी एकमेकांशी भांडणं विसरुन मैत्रीचा हात पुढे केला...

सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य
'बिग बॉस मराठी सीझन ६' चा फिनाले आता जवळ आला आहे. घरात राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि अनुश्री माने टॉप ५ सदस्य राहिले आहेत. बिग बॉसचा हा प्रवास संपायला आता शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने घरातील सदस्यांनी एकमेकांशी भांडणं विसरुन मैत्रीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे यात राकेश बापट आणि विशाल कोटियननेही हात मिळवला आहे. बिग बॉसचा नवीन प्रोमो सध्या व्हायरल होतोय.
बिग बॉसच्या घरात टॉप ५ स्पर्धक राहिले आहेत. हे पाचही जण फायनलिस्ट असल्याने त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. सगळे एकमेकांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त करत आहेत. सगळे रुसवे फुगवे विसरत आहेत. घरातील शेवटचे दिवस हसत खेळत राहुया असंच जणू म्हणत आहेत. दीपाली सर्वांना साखर देऊन तोंड गोड करते. अनुश्री आणि तन्वीला जवळ घेते. तर दुसरीकडे विशाल राकेशला आवाज देऊन 'सॉरी यार' म्हणतो आणि दोघं गळाभेट घेतात. एकूणच आता सदस्यांच्या मनातील अंतर कमी होताना दिसत आहे. तसंच कोण विजेता होणार याचीही धाकधूक सदस्यांच्या मनात आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये विशालचं कौतुक केलं आहे. 'विशाल मनाने खूप चांगला आहे', 'अखेर विशालने राकेशची माफी मागितलीच', 'राकेश विजेता झाला तरी आवडेल पण तन्वी नको', 'काल तन्वीने पातळी सोडली'.
'बिग बॉस मराठी सीझन ६'चा फिनाले १९ एप्रिल रोजी होणार आहे. गेल्या आठवड्यात रितेश भाऊंचा या सीझनचा शेवटचा 'भाऊचा धक्का' झाला. सीझनच्या या शेवटच्या टप्प्यात रेवा कौरसेला घराबाहेर जावं लागलं. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या रेवाने आपल्या खेळातून सर्वांचं मन जिंकलं होतं. मात्र वोट्स कमी मिळाल्याने तिचा घरात प्रवास इथेच थांबला. यावेळी तिची मैत्रीण तन्वीला खूप वाईट वाटलं. तिने अनुश्री आणि विशालवर वाईट भाषेत टिप्पणी केली ज्यामुळे आता तिच्यावर टीका होत आहे. १९ एप्रिलला कोण ट्रॉफी जिंकणार याची चुरस आता वाढली आहे.