'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:29 IST2026-04-15T12:28:56+5:302026-04-15T12:29:52+5:30
तन्वीला 'ते' वक्तव्य भोवणार?

'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स
'बिग बॉस मराठी सीझन ६' आता शेवटच्या टप्प्यात असून अगदी शेवटच्या क्षणी प्रेक्षकांच्या पसंती-नापसंतीचे समीकरणही वेगाने बदलताना दिसत आहे. घरात टॉप ५ स्पर्धक उरले असतानाच, तन्वी कोलते आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. आतापर्यंत तन्वी विजेतेपदाची प्रमुख दावेदार होती. मात्र आता तिला प्रेक्षकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. नक्की काय आहे प्रकरण?
तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले
'बिग बॉस'च्या घरातून गेल्या आठवड्यात रेवा कौरसे बाहेर पडली. आपली जवळची मैत्रीण घराबाहेर गेल्याने तन्वीला मोठा धक्का बसला आणि ती कमालीची भावुक झाली. मात्र, याच भावनेच्या भरात तिने घरातील इतर दोन सदस्य – अनुश्री माने आणि विशाल कोटियन यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी केली. तन्वीच्या या वागण्याने प्रेक्षक नाराज झाले असून सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. रेवाच्या जाण्याला अनुश्री आणि विशाल जबाबदार आहेत, असा सूर लावत तन्वीने त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली' अशा आशयाचे विधान केल्यामुळे तन्वीला ट्रोल केले जात आहे. तसंच यावर अनुश्री म्हणते, 'आमचं मन चांगलं नाहीये का..आम्ही मनातूनच घाण आहे. काहीपण बोलते, माणूस घरातून जातोय तरी हिचं काहीतरी वेगळंच सुरुये.'
नेटकऱ्यांच्या मते, खेळात हार-जीत होतच असते, पण सहकाऱ्यांबद्दल अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. "तन्वीने आपला संयम गमावला आहे," अशा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.
सोशल मीडियावर तन्वीच्या विरोधात एक लाट निर्माण झाली असून अनेक युजर्सनी "आता तन्वीला वोट करणार नाही" असा पवित्रा घेतला आहे. फिनालेच्या अगदी तोंडावर तन्वीने घेतलेली ही भूमिका तिच्यासाठी महागात पडू शकते, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, विशाल आणि राकेशने जुने वाद विसरून मैत्रीचा हात पुढे केला असताना तन्वीचा हा संताप प्रेक्षकांना फारसा रुचलेला नाही.
१९ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा वेळी प्रेक्षकांचा हा रोष तन्वीच्या वोटिंगवर काय परिणाम करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तन्वी, राकेश, विशाल, दीपाली आणि अनुश्री या पाच दिग्गजांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण ट्रॉफी उंचावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.