थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून सिंहासनावर विराजमान, पाहा थलपतीचा नेमका अर्थ काय आणि त्याचं खरं नाव काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:23 IST2026-05-10T16:23:15+5:302026-05-10T16:23:50+5:30
Thalapathy Vijay : विजयची मुख्य ओळख ही थलपती विजय अशी आहे. पण अनेकांना थलपतीचा नेमका अर्थ काय हे माहीत नाही. तोच आज आपण यानिमित्ताने पाहुयात.

थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून सिंहासनावर विराजमान, पाहा थलपतीचा नेमका अर्थ काय आणि त्याचं खरं नाव काय?
Thalapathy Vijay : सध्या सगळ्या मीडियातच काय तर सोशल मीडियावरही थलपति विजयची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण तो आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर विराजमान झालाय. साऊथ सिनेमातील सुपरस्टार ते तामिळनाडूचा मुख्यमंत्री हा विजयचा प्रवास खरंच सगळ्यांनाच थक्क करणारा ठरतोय. काही महिन्यांआधीच त्याने 'तमिलगा वेत्री कड़गम' (TVK) पक्ष तयार केला आणि आता तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री झालाय. विजयची मुख्य ओळख ही थलपती विजय अशी आहे. पण अनेकांना थलपतीचा नेमका अर्थ काय हे माहीत नाही. तोच आज आपण यानिमित्ताने पाहुयात.
कमांडर ते थलपती विजयपर्यंतचा थक्क करणारा प्रवास
मुळात जरी थलपती विजय ही विजयची सिनेमातील ओळख असली तरी त्याचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. वयाच्या ५१व्या वर्षी त्याने तमिळ चित्रपटसृष्टीत म्हणजेच कॉलीवुडमध्ये असे स्थान निर्माण केले आहे की त्यांची तुलना थलैवा रजनीकांत आणि कमल हसन यांसारख्या दिग्गज कलाकारांशी केली जाते. कोट्यवधी चाहत्यांसाठी विजय हे केवळ अभिनेता नाहीत, तर त्यांचे ‘थलपती’ आहेत. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांची स्टाईल, संवाद आणि व्यक्तिमत्त्वही प्रचंड लोकप्रिय आहे.
‘थलपती’ शब्दाचा खरा अर्थ काय?
तमिळ भाषेत ‘थलपती’ या शब्दाचा खूप खास आणि प्रभावी अर्थ आहे. याचा अर्थ ‘कमांडर’, ‘सेनापती’ किंवा ‘नेता’ असा होतो. हा शब्द Joseph Vijay Chandrasekhar याला चाहत्यांनी दिलेली एक खास उपाधी आहे. तमिळ चित्रपटांमध्ये त्याच्या दमदार कामामुळे आणि लोकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे त्याला ‘थलपती’ म्हटलं जाऊ लागलं. हा शब्द रजनीकांत यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘थलैवा’ या शब्दापेक्षा वेगळा आहे. ‘थलैवा’चा अर्थ ‘बॉस’ किंवा ‘नेता’ असा होतो, तर ‘थलपती’मध्ये नेतृत्वासोबत लढवय्या आणि मार्गदर्शक अशी प्रतिमा दिसून येते.
चित्रपटांमध्ये विजय यांनी अनेकदा सामान्य लोकांसाठी लढणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना ही उपाधी दिली आणि आज ‘थलपती’ हे नावच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनले आहे.
वडिलांनी दिली होती ‘युवा कमांडर’ची ओळख
जोसेफ विजय चंद्रशेखरच्या ‘थलपती’ बनण्याची कहाणी १९९४ सालापासून सुरू होते. त्याचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता S. A. Chandrasekhar यांनी विजयला प्रथमच ‘इलाया थलपती’ म्हणजेच ‘युवा कमांडर’ म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केले होते. त्यामुळे ‘इलाया’ हा शब्द त्याच्या तरुण प्रतिमेचं प्रतीक बनला होता. पुढील साधारण तीन दशकं चाहत्यांनी त्याला ‘इलाया थलपती’ या नावानेच हाक मारली. हळूहळू हे नाव तमिळ चित्रपटसृष्टीतील एक मोठा ब्रँड बनलं आणि विजयच्या व्यक्तिमत्त्वाची खास ओळख ठरलं.