'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:19 IST2026-04-30T16:18:38+5:302026-04-30T16:19:06+5:30

'राजा शिवाजी'चा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या. परंतु रितेशने कोणत्याही वादात न पडता सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली.

raja shivaji movie controversy and key facts riteish deshmukh genelia sanjay duttX | 'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...

'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...

'राजा शिवाजी' हा सिनेमा १ मे २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजा शिवाजी'चा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या. परंतु रितेशने कोणत्याही वादात न पडता सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली. एकूणच सिनेमातील काही प्रसंगावरुन वाद निर्माण झाले असले तरीही रितेशने काही गोष्टींमध्ये मात्र जरुर बाजी मारली आहे, हेही नाकारुन चालणार नाही. 

छत्रपती शिवराय म्हणून रितेश शोभतो का?

'राजा शिवाजी' सिनेमाचा पहिला टीझर जेव्हा आला तेव्हा सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली ती म्हणजे छत्रपती शिवराय म्हणून रितेश तितका प्रभावी वाटत नाही. रितेशने 'मस्ती', 'हाउसफुल्ल' सारखे वेगळे सिनेमे केले आहेत त्यामुळे शिवरायांच्या भूमिकेत रितेशला पाहणं योग्य वाटत नाही असे नाराजीचे सूर उमटले. परंतु रितेशने 'राजा शिवाजी' सिनेमासाठी घेतलेली मेहनत आणि त्याच्या आत दडलेली सच्ची भावना त्याच्या अभिनयात झळकतेय.



आजवर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आपण अनेक अभिनेत्यांना बघितलं आहे. त्यामुळे महाराजांच्या व्यक्तिमत्वाची एक ठराविक प्रतिमा आपल्या मनात घर करुन आहे. अशा प्रतिमेत रितेशला शिवरायांच्या भूमिकेत पाहणं हे पहिल्यांदा वेगळं वाटणं साहजिक आहे. हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची रितेशची भावना खूप खरी आहे. याशिवाय आपण कोणती भूमिका साकारतोय, याचं रिेतेशला गांभीर्य आहे. आणि मुळात, रितेश एक कलाकार आहे. वैविध्यपूर्ण सिनेमात काम करणं हीच प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. त्यामुळे 'राजा शिवाजी' मध्ये रितेशला छत्रपतींच्या भूमिकेत पाहणं नक्कीच संस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही.

वाघनखांचा मुद्दा 

अफजलखानाला यमसदनी धाडण्यासाठी छत्रपती शिवरायांनी वाघनखांचा वापर केला हे आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतु काही नेटकऱ्यांनी 'राजा शिवाजी'च्या या प्रसंगावर आक्षेप घेतला. भाजप कार्यकर्ता सुरेख नखुआ यांनी ट्रेलरमधील या दृश्यावर टिप्पणी केली. ते लिहितात, रितेश देशमुखच्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाने वार करण्याआधीच त्याला वाघनखं दाखवत आहेत. मात्र इतिहासात असं नमूद आहे की अफजल खानाने वार केल्यानंतरच महाराजांनी वाघनखांचा वापर केला आहे.रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि अस्मितेची मोडतोड व अपमान का करत आहे?" 

यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, "आदरणीय सर, कृपया १ मे रोजी सिनेमा बघा. तुम्हाला याचं उत्तर सिनेमातच मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला सिनेमा आवडेल अशी आशा करतो. जय शिवराय." त्यामुळे एकूणच आपण काय दाखवत आहोत याचं पुरेपुर भान रितेशला आहे. त्याला 'राजा शिवाजी' मध्ये काहीही वादग्रस्त दाखवायचं नाहीये. रितेशला विषयाचा आणि प्रेक्षकांच्या भावनेचा आदर आहे.

अजय-अतुलचं संगीत

'राजा शिवाजी'चं पहिलं पोस्टर जेव्हा आलं तेव्हा एका गोष्टीने प्रेक्षक नक्कीच सुखावले. ती म्हणजे अजय-अतुलचं संगीत. रितेशच्या प्रत्येक मराठी सिनेमासाठी अजय-अतुल यांनी संगीतकार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. 'राजा शिवाजी'साठीही अजय-अतुल यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. 'राजा शिवाजी'चं अँथम साँग अल्पावधीत व्हायरल झालं. आज प्रत्येकाच्या मोबाईलवर आणि सोशल मीडियावर हे अँथम साँग वाजतं. त्यामुळे अजय-अतुलच्या संगीताची क्रेझ पुन्हा दिसून आली. रितेशची या दोघांसोबतही चांगली मैत्री आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग व्हायच्या आधीपासूनच ते एकमेकांसोबत या सिनेमाविषयी काम करत आहेत. त्यामुळे अजय-अतुलचं संगीत 'राजा शिवाजी' मधील प्रसंगांना अधिक परिणामकारक करेल यात शंका नाही.



हिंदीतले बडे कलाकार पहिल्यांदाच मराठीत

अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, फरदीन खान आणि संजय दत्त हे हिंदीतले धुरंधर कलाकार यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करणार आहेत. अभिषेक बच्चन रितेशला मोठ्या भावासारखा आहे. त्यामुळे अभिषेकने तातडीने या सिनेमासाठी होकार दिला होता.  विद्या बालन आणि संजय दत्त यांच्यासोबतही रितेशने काम केलंय. त्यामुळे सर्वांनी रितेशच्या शब्दाखातर आणि त्याच्यावरील विश्वासामुळे 'राजा शिवाजी' स्वीकारला. हिंदीतले हे लोकप्रिय स्टार्स त्यानिमित्ताने प्रथमच मराठी सिनेमात काम करत आहेत. ही मराठी सिनेसृष्टीसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

बिग बजेटचा मराठी सिनेसृष्टीला फायदा

'राजा शिवाजी' सिनेमा अंदाजे १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलाय अशी चर्चा आहे. याचा मराठी सिनेसृष्टीसाठी नक्कीच फायदा होईल. जिनिलीया देशमुख आणि 'राजा शिवाजी'च्या अन्य निर्मात्यांनी हा ऐतिहासिक पट भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नाहीये. एकूणच 'राजा शिवाजी'मुळे इतरही मराठी सिनेमांना फायदा मिळेल. याशिवाय सिनेमाने भरघोस कमाई केली तर बड्या प्रॉडक्शन कंपनी मराठी सिनेमात गुंतवणूक करतील.  त्यामुळे 'राजा शिवाजी' सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीकडे काही निर्माते संधी म्हणून बघतील आणि याचा फायदा आपल्या चित्रपटसृष्टीला होईल हेही नाकारुन चालणार नाही. 'कांतारा'सारखा मराठी सिनेमाही पॅन इंडिया स्तरावर ओळखला जाईल.

कोणताही ऐतिहासिक सिनेमा म्हटला की, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगतात. 'राजा शिवाजी' सुद्धा या गोष्टीला अपवाद ठरला नाही. पण तरीही रितेशने या नकारात्मक चर्चांकडे दुर्लक्ष करुन गेले काही दिवस सिनेमाचं चांगलं प्रमोशन करण्याकडे भर दिला. ''मी महाराज नाही तर मी त्यांचा मावळा म्हणून काम केलंय'', हे रितेश वारंवार सांगत आलाय. हीच भावना लक्षात घेऊन रितेशच्या आधीच्या सिनेमांप्रमाणे 'राजा शिवाजी'ला सुद्धा प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Web Title : राजा शिवाजी फिल्म: विवादों के बावजूद रितेश देशमुख ने बाजी मारी।

Web Summary : 'राजा शिवाजी' को लेकर विवादों के बावजूद, रितेश देशमुख दर्शकों तक पहुंचने पर ध्यान केंद्रित करते हैं। उनका समर्पण और अजय-अतुल का संगीत खास है। हिंदी सितारे मराठी सिनेमा को बढ़ावा देते हैं। बड़ा बजट फिल्म उद्योग को फायदा पहुंचा सकता है।

Web Title : Raja Shivaji Movie: Ritesh Deshmukh wins despite controversies and discussions.

Web Summary : Despite controversies surrounding 'Raja Shivaji', Ritesh Deshmukh focuses on reaching audiences. His dedication and Ajay-Atul's music stand out. Hindi stars join, boosting Marathi cinema. A big budget may benefit the film industry.