IN PICS : फुल्ल फिल्मी आहे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांची लव्हस्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:25 PM2022-11-14T16:25:33+5:302022-11-14T17:14:53+5:30

Aadesh Bandekar, Suchitra Bandekar : आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर आज आपल्या लग्नाचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दोघांची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे...

‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलंय. त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर या सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील या लाडक्या जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस.

आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर आज आपल्या लग्नाचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दोघांची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे.

आदेश आणि सुचित्रा यांची प्रेमकथा ही अतिशय फिल्मी आहे. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केलं होतं. सुचित्रा यांना पाहताच आदेश त्यांच्या प्रेमात पडले होते.

सुचित्रा यांच्या शाळेच्या परिसरात आदेश अनेक वेळा जात असत. त्यांना पाहून ‘माझा पाठलाग करू नकोस, मी काही तुला होकार देणार नाही’,असं सुचित्रा यांनी सांगितलं. पण आदेश यांनी सुचित्रांचा पिच्छा सोडला नाहीच.

एकदा आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या.

इकडे आदेश त्यांची वाट पाहून थकलेत. मग काय? आदेश थेट सुचित्रा यांच्या घरी गेले. सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. आदेश मस्तपैकी त्यांच्या आईशी गप्पा मारत होते...

सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच बाहेर निघाले. पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असं कारण देत तिथून निसटले आणि त्यांनी पुन्हा सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश प्रचंड चिडलेले होते.

मला आजच हो तर हो नाही तर नाही सांग... मी तुला पुन्हा विचारणार नाही... आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो... मी तुला पाच मिनिटं देतो मला उत्तर दे, असे आदेश म्हणाले. त्यावर महालक्ष्मीला कधी जायचं...? असं सुचित्रांनी विचारत सुचित्रांनी आदेश यांना होकार दिला.

सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याला सुचित्रा यांच्या घरातून खूप विरोध होता. आदेश त्यावेळी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता सुचित्रा यांनी त्यांच्या सोबत लग्न केलं. मी क्लासला जाते असे सांगून त्या घरातून निघून गेल्या आणि त्यांनी वांद्रे कोर्टात जाऊन आदेश यांच्या सोबत लग्न केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांच्या लग्नाचा खर्च केवळ ५० रुपये आला होता.