पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:07 IST2026-04-22T15:02:31+5:302026-04-22T15:07:55+5:30
पार्थ हा मुळचा पुण्याचा आणि मराठी आहे. सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा करताना पार्थने एक लांबलचक पोस्ट शेअर केली.

पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण
Parth Samthaan Break From Social Media : टीव्ही जगतातील चॉकलेट बॉय आणि आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता पार्थ समथान सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पार्थने अचानक सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सततचे ट्रोलिंग आणि कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे पार्थने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा करताना पार्थने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिलं, "मी नेहमीच शांत आणि सकारात्मक राहणारा, चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा माणूस आहे. पण अलीकडे मला लक्षात आलं की कुणीतरी बनावट अकाउंट्स खरेदी करून त्याद्वारे माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्याबद्दल आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वाईट कमेंट्स करत आहे".
पुढे त्याने सांगितलं की, "हे खूप धक्कादायक आणि अत्यंत दुखावणारं आहे. यामुळे मला खूप रागही आला आहे.यामागे कोण आहे याची मला कल्पना आहे, पण कोणाचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. म्हणूनच मी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर क्राइम विभागात तक्रार करून माझी ऊर्जा वाया घालवायची नाही, त्याऐवजी माझ्या आयुष्यावर आणि 'माहिद' या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणार आहे", असं त्यानं पोस्टच्या शेवटी म्हटलं.

पार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या कलर्स चॅनेलवरील 'सेहर - होने को है' या लोकप्रिय मालिकेत 'माहिद' ही भूमिका साकारताना दिसत आहे. पार्थने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. कैसी ये यारियां, कसौटी, ये है आशिकी, गुमराह, प्यार तुने क्या किया यांसारख्या मालिकांमध्ये दिसला. पार्थ हा मुळचा पुण्याचा आणि मराठी आहे.