"महाराजांच्या कारकिर्दीत अजय-अतुल यांचा जन्म झाला असेल आणि...", 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गायकाची डोळे पाणावणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:03 IST2026-04-23T18:03:33+5:302026-04-23T18:03:59+5:30
'राजा शिवाजी' या सिनेमाला लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांचं संगीत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात अजय-अतुल यांच्या गाण्याला कोरस दिलेल्या गायक स्वप्नील गोडबोलेने खास पोस्ट लिहिली आहे.

"महाराजांच्या कारकिर्दीत अजय-अतुल यांचा जन्म झाला असेल आणि...", 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गायकाची डोळे पाणावणारी पोस्ट
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाला लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांचं संगीत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात अजय-अतुल यांच्या गाण्याला कोरस दिलेल्या गायक स्वप्नील गोडबोलेने खास पोस्ट लिहिली आहे.
स्वप्नील गोडबोलेची पोस्ट
मी, अजय-अतुल आणि "छत्रपती शिवाजी महाराज" मित्रांनो, आज पहिल्यांदा एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करतोय. गोष्ट २००९ पासून चालू होते जेव्हा "अजय-अतुल" यांचा सहवास चालू झाला. आपण एखाद्या छोट्या गावातून यावं आणि आपल्याला आपलं दैवत भेटावं यासाठी माझ्या आई-वडिलांची काहीतरी पुण्याई असावी हे नक्की!
मागची अनेक वर्षे त्यांच्यासोबत खूप जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही सगळेच एक कुटुंब म्हणून एकत्र काम करतोय. "कोरस" गायक म्हणून खूप वर्षे खूप वेगवेगळ्या लोकांसोबत काम केल्यानंतर मी "कोरस" गायचं बंद करण्याचा एक निर्णय घेतला कारण मी एक संगीतकार आणि पार्श्वगायक म्हणून माझी कारकीर्द सुरु केली, तरी अजूनही फक्त या दोघांच्या साठीच मी "कोरस" गातो आहे आणि मला नाही वाटत की हे मी मरेपर्यंत बंद करेन. कारण त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, शिक्षण, संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन हे अमूल्य आहे.
बरं, आता येतो महत्वाच्या मुद्द्यावर, "छत्रपती शिवाजी" महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय "राजा शिवाजी". त्याचं "संगीत" ही प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. लहानपणापासून "राजे" हे रक्तात भिनलेले होते. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना तेव्हापासूनच होती. अनेक चित्रपट, अनेक गाणी आतापर्यंत त्या त्या काळात खूप लोकांनी त्यांच्या परीने सगळं चांगलंच बनवलं पण आत्ता जे आलंय आणि जे येणारे ते अभूतपूर्व, अद्वितीय, अलौकिक, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय आहे हे नक्की!
कदाचित "महाराजांच्या" कारकिर्दीत "अजय-अतुल" यांचा एखादा जन्म झाला असेल आणि त्या काळी त्यांचं काहीतरी "महाराजांना" द्यायचं राहून गेलं असेल म्हणून हे भाग्य त्यांच्या नशिबी आलं आणि त्या त्यांच्या नशिबात त्यांनी आम्हाला सामावून घेतलं, यासाठी कितीही ऋणी राहिलं तरी कमी आहे. "राजा शिवाजी" या चित्रपटाचं प्रत्येक गाणं गाताना जणू आपण पण या "हिंदवी स्वराज्याच्या" "महाराजांच्या" स्वप्नाचा एक भाग आहोत या भावना होत्या. "अजय-अतुल" यांनी महाराजांच्या प्रति त्यांचे "सांगीतिक प्रधानसेवक" म्हणून काम करून आम्हाला या मोहिमेत "मावळे" म्हणून सामील करून घेतले हे आमचे भाग्यच ! "मराठी" माणसाने "छत्रपती शिवाजी" महाराजांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट आपण "शिवभक्त" म्हणून बघितलाच पाहिजे ! अखंड हिंदुस्थानासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक प्रेरणा, एक आदर्श, एक देव आणि एक धर्म हे फक्त एक आणि एकच "छत्रपती" झाले ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"
रितेश भाऊ, अजय-अतुल दादा आणि "राजा शिवाजी" या चित्रपटाच्या संपूर्ण समुहाला प्रचंड प्रचंड शुभेच्छा! हा चित्रपट खूप खूप गाजूदे, नावाजूदे आणि अनंत काळासाठी यांचं संगीत आसमंतात "भगव्यासारखं" डौलाने फडकत राहूदे हीच "आई भवानी" चरणी प्रार्थना! जय भवानी! जय जीजाऊ ! जय शिवराय !
दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. या सिनेमात जिनिलिया देशमुख राणी सईबाई तर भाग्यश्री राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अफजलखान, फरदीन खान शाहजहान, विद्या बालन बडी बेगम यांच्या भूमिकेत आहेत. तर महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.