हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? 'धुरंधर' रणवीर सिंह म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:48 IST2026-04-27T15:46:40+5:302026-04-27T15:48:05+5:30
'पद्मावत'चा 'खिलजी' की 'धुरंधर'चा 'हमजा'? रणवीर सिंह म्हणाला...

हमजा की खिलजी...कोणती भूमिका आव्हानात्मक होती? 'धुरंधर' रणवीर सिंह म्हणाला...
२०१८ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटातील 'खिलजी' या क्रूर भूमिकेने रणवीर सिंहने सर्वांना चकित केले होते. मात्र आता २०२६ मध्ये आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' मधील 'हमजा' ही भूमिका साकारणे खिलजीपेक्षाही अधिक आव्हानात्मक होते असं तो म्हणाला. रणवीरचा बिझनेस पार्टनर निकुंज बियाणी याने एका पॉडकास्टमध्ये या पडद्यामागच्या संघर्षाचा उलगडा केला आहे.
MensXP ला दिलेल्या मुलाखतीत निकुंज बियाणी म्हणाले, "मी धुरंधर आणि धुरंधर २ हे दोन्ही सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिले. मला धुरंधर २ जास्त आवडला. पहिला पार्टही चांगलाच होता रण धुरंधर २ काहीतरी वेगळाच होता. मला माझ्या सीटवरुन उठायचीही इच्छा नव्हती. म्हणजे एक सेकंदासाठी पापण्याही बंद करु नये इतका मी सिनेमाला खिळलेलो होतो."
ते पुढे म्हणाले, "रणवीरशी चर्चा करताना आम्ही त्याला विचारले होते की, तू पुन्हा खिलजीसारखी एखादी कठीण भूमिका करशील का? त्यावर रणवीर म्हणाला होता की, हमजा हे पात्र मला खिलजीपेक्षा कित्येक पटीने जास्त आव्हानात्मक वाटलं. या भूमिकेसाठी मला माझ्या क्षमतेच्या ३०० टक्के योगदान द्यावे लागले. हमजा साकारताना माझ्या अभिनयाचा अक्षरश: कस लागला होता."
'पद्मावत'मधील खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीरने स्वतःला २१ दिवस एका अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतले होते आणि तो मानसिकदृष्ट्या एका वेगळ्याच विश्वात गेला होता. त्या चित्रपटाने जगभरात ५८५ कोटींची कमाई केली होती. मात्र, 'धुरंधर २' मधील हमजाची मानसिक गुंतागुंत खिलजीपेक्षाही खोल होती आणि ही दहशत पडद्यावर जिवंत करण्यासाठी रणवीरला प्रचंड मानसिक आणि शारीरिक मेहनत घ्यावी लागली.
'धुरंधर' ही दोन भागांची स्पाय-थ्रिलर फिल्म मालिका असून यात हमजा या भारतीय एजंटची कथा दाखवण्यात आली आहे. हमजा पाकिस्तानमधील 'लियारी' येथील अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करतो आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचून भारताला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कचा खात्मा करतो. ही कथा आणि रणवीरचा अभिनय यामुळे या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
बॉक्स ऑफिसवरील यशाबद्दल बोलायचे झाले तर 'धुरंधर' फ्रँचायझीने जगभरात ३००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. २०२५ मध्ये आलेल्या पहिल्या भागाने १३०० कोटी मिळवले होते, तर 'धुरंधर २' ने १७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, भारतात १००० कोटींची कमाई करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला असून रणवीर सिंहने पुन्हा एकदा तो GOAT असल्याचं सिद्ध केलं आहे.