"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:20 IST2026-04-21T12:17:24+5:302026-04-21T12:20:09+5:30

'राजा शिवाजी'मध्ये विद्याची एन्ट्री कशी झाली? रितेशबद्दल अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

Raja Shivaji Movie Trailer Launch Vidya Balan Entry Story Riteish Deshmukh | "मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली?

"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा 'राजा शिवाजी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहे. विशेष म्हणजे 'राजा शिवाजी' सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. काल या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बडी बेगम' साकारत असलेल्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या ट्रेलर लाँच सोहळ्यात विद्या बालननं रितेशबद्दल आणि या ऐतिहासिक चित्रपटात तिची एन्ट्री कशाप्रकारे झाली, याबद्दल खुलासा केला.

विद्या म्हणाली, "सगळ्यांना नमस्कार... अभिषेक आणि संजू म्हणतात की रितेश त्यांचा छोटा भाऊ आहे… पण माझा नाही. मात्र तो माझा चांगला मित्र आहे". यावर एकच हशा पिकला. पुढे ती म्हणाली, "मला तुम्हाला एक खरं सांगायचं आहे. जेव्हा मला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट बनतोय आणि तो रितेश करत आहे. तेव्हा माझ्या मनात आलं की छान... संजू करत आहे, अभिषेक करत आहे… पण रितेश माझ्याकडे का आला नाही? मग वाटलं, कदाचित माझ्यासाठी काही रोल नसेल, किंवा कदाचित त्याला मी अभिनेत्री म्हणून पसंत नसावी".

रितेश जेव्हा भूमिकेसाठी विद्याकडे गेला, तेव्हाचा किस्सा सांगताना ती म्हणाली, "पण नंतर तो माझ्याकडे आला. मी आधीच ठरवलं होतं की मी हा सिनेमा करणारच. त्याने मला कथा सांगितली आणि मी खूप लक्ष देऊन ऐकत होते. मी त्याला म्हणाले, थोडं विचार करून सांगते, कारण मला माझी उत्सुकता लगेच दाखवायची नव्हती. त्याला कळू नये की मी खरंतर त्याच्या येण्याची वाटच पाहत होते. तो घरून निघून गेला आणि मी लगेच त्याला फोन केला व सांगितलं, मी हा सिनेमा करते आहे".

विद्या म्हणाली, "माझा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या भव्य मराठी चित्रपटाचा भाग होणे, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात काम करणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानची बाब आहे. त्यामुळे खूप उस्तुक आहे", या शब्दात विद्यानं आनंद व्यक्त केला. पुढे रितेशच्या दिग्दर्शनाचं कौतुक करताना विद्या म्हणाली, "बडी बेगम पात्राबद्दल त्यानं ज्याप्रकारे मला माहिती, तपशील दिला, ते पाहून मी थक्क झाले. तो सांगतोय, ते फक्त मी ऐकत होते. मला रितेशसोबत काम करुन खूप चांगलं वाटलं". 

महाराष्ट्र दिनी होणार प्रदर्शित
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहे. तर जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Raja Shivaji Movie Trailer Launch Vidya Balan Entry Story Riteish Deshmukh