'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:36 IST2026-04-14T12:35:35+5:302026-04-14T12:36:29+5:30
हुमाने दिग्दर्शिका फराह खानच्या पार्टीत एड शीरनशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला.

'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या आगामी 'टॉक्सिक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हुमाने अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हुमाने एक आठवण शेअर केली आहे. प्रसिद्ध हॉलिवूड गायक एड शीरनने 'गँग्स ऑफ वासेपूर' पाहिला असून त्याने या चित्रपटाचे भरभरून कौतुक केल्याचे हुमाने सांगितले.
हुमाने दिग्दर्शिका फराह खानच्या पार्टीत एड शीरनशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. प्रखर गुप्तांना दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली की, "एड शीररने गँग्स ऑफ वासेपूर पाहिला आणि त्याला खूप आवडला हे जेव्हा मला त्याच्याकडून समजलं ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी हे ऐकूनच चकितच झाले होते. एड शीरन मुंबईत आला होता तेव्हा फराह खानच्या पार्टीत मी त्याला भेटले होते. मी त्याच्याशी बोलले तेव्हा तो म्हणाला, 'मला भारत देश खूप आवडतो आणि मला इथे संगीतावर काम करायला आवडेल.' मी त्याला काही हिंदी शब्दही शिकवले."
ती पुढे म्हणाली, "मी एड शीरनला आणखी इंटरेस्टिंग भाषा शिकायची असेल तर गँग्स ऑफ वासेपूर बघ असे सुचवले. तेव्हा तो लगेच मला म्हणाला,'क्या आप उस फिल्म मे थी?' मी म्हणाले, 'हो'. तो म्हणाला, 'मी काही दिवसांपूर्वीच तो सिनेमा बघितला. मला खूप आवडला. खरोखरच दमदार सिनेमा आहे'. माझ्यासाठी तो क्षण खूप खास होता."
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळा इतिहास रचला आहे. दोन भागांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, रिचा चड्ढा आणि पियुष मिश्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटामुळेच हुमा कुरेशीला खरी ओळख मिळाली आणि आज एड शीरनसारख्या कलाकाराने या कामाची प्रशंसा करणे हा हुमासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला.
हुमा कुरेशी आता लवकरच 'टॉक्सिक' या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार यश दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत असे तगडे कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' हा चित्रपट ४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.