अक्षय कुमार वर्षाला ४ चित्रपट का करतो? एकता कपूरचा मोठा खुलासा; कारण ऐकून टीका करणाऱ्यांची होईल बोलती बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:43 IST2026-05-07T12:38:35+5:302026-05-07T12:43:47+5:30
अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षात चार चित्रपट प्रदर्शित होतात.

अक्षय कुमार वर्षाला ४ चित्रपट का करतो? एकता कपूरचा मोठा खुलासा; कारण ऐकून टीका करणाऱ्यांची होईल बोलती बंद!
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या कामाच्या वेगाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. वर्षाला ३-४ चित्रपट करण्यावरून अनेकदा त्याच्यावर टीकाही केली जाते. मात्र, आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने अक्षय कुमारच्या या कार्यपद्धतीचे समर्थन करत त्यामागचे एक महत्त्वाचे व्यावसायिक कारण सांगितले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना एकता कपूरने चित्रपटसृष्टीतील शिस्त आणि सातत्य यावर भर दिला. ती म्हणाली, "मोठे चित्रपट अधूनमधून येतात, पण अक्षय कुमारसारखे अभिनेते वर्षाला अनेक चित्रपट करून इंडस्ट्रीला सतत काम पुरवतात. जर अक्षयने वर्षाला एकच चित्रपट केला, तर इंडस्ट्रीची गती मंदावेल. नियमित कामामुळेच चित्रपटसृष्टी चालते, केवळ स्टारडममुळे नाही".
एकताने आपले वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा संदर्भ देत अक्षयचे कौतुक केले. ती म्हणाली की, "माझ्या वडिलांप्रमाणेच अक्षय कुमारमध्येही कमालीची व्यावसायिक वृत्ती आहे. त्यांच्या अशा कामामुळे केवळ मोठ्या निर्मात्यांनाच नाही, तर लहान आणि मध्यम-स्तरीय निर्मात्यांनाही काम मिळते. यामुळे हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होतो आणि चित्रपटसृष्टीची ताकद वाढते".
एकता कपूरच्या मते, अक्षयच्या कामाच्या वेगामुळे नवीन प्रोजेक्ट्स सतत बनत राहतात. अलीकडेच अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या यशाचा उल्लेख करत एकता म्हणाली की, "असे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतातच, पण सोबतच बॉक्स ऑफिसची गतीही कायम राखतात". अनेक लोक विचारतात की अक्षय इतके चित्रपट का करतो? यावर एकता म्हणाली, "वास्तविक पाहता, हीच चित्रपटसृष्टीची सर्वात मोठी ताकद आहे. सातत्यपूर्ण काम करणारा अभिनेता उद्योगासाठी वरदान असतो".