'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:19 IST2026-04-29T11:19:04+5:302026-04-29T11:19:43+5:30
'उरी' आणि 'धुरंधर'नंतर आदित्य धर आणखी काय कमाल करणार?

'धुरंधर' गाजवल्यानंतर आदित्य धरच्या आगामी सिनेमातही रणवीर सिंह? दोघांमध्ये चर्चा सुरु
आदित्य धरने 'धुरंधर' आणि 'धुरंधर २'मधून बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले. अभिनेता रणवीर सिंहची त्याला उत्तम साथ लाभली. दोन्ही चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर, आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धरकडे एक नवीन आणि जबरदस्त कल्पनेवर आधारित कथा आहे . दरम्यान अद्याप सिनेमाच्या कास्टिंगवर चर्चा सुरु आहे ज्यासाठी रणवीर सिंहचे नाव आघाडीवर आहे
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आदित्य धर आता आपल्या करिअरमधील सर्वात मोठ्या 'लार्जर दॅन लाईफ' प्रोजेक्टवर काम करत आहेत. यासाठी त्याच्याकडे जबरदस्त संकल्पना आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून मार्च २०२७ पर्यंत याचे चित्रीकरण सुरू करण्याचा त्याचा प्लॅन आहे आहे. आदित्य धर या नवीन कल्पनेबद्दल प्रचंड उत्साही असून तो चित्रपट मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणवीर सिंह सध्या 'डॉन ३' सोडल्यामुळे चर्चेत असतानाच, आदित्य धरसोबतच्या या नवीन प्रोजेक्टची बातमी समोर आली आहे. जरी या प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी रणवीर आणि आदित्य यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. जर सर्व काही सुरळीत पार पडले, तर २०२७ च्या अखेरीस किंवा २०२८ च्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळू शकतो.
आदित्य धरचा करिअर ग्राफ
आदित्य धरचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दिल्लीतील काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या आदित्यने सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक, गीतकार आणि संवाद लेखक म्हणून काम केले. त्याने 'काबुल एक्सप्रेस' आणि 'हाल-ए-दिल' सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली, तर प्रियदर्शन यांच्यासोबत 'आक्रोश' आणि 'तेज' सारख्या चित्रपटांसाठी संवाद लेखक म्हणून काम केले. दिग्दर्शक बनण्यापूर्वी त्याने चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांचा अनुभव घेतला आहे.
आदित्य धरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'रात बाकी' हा फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्यामुळे डब्यात गेला होता. मात्र, त्यानंतर त्याने २०१९ मध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दमदार पदार्पण केले. केवळ ४४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ३४१ कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला. या यशानंतर त्याने 'धुरंधर'च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर आपले स्थान पक्के केले.
आदित्य धरच्या फिल्मोग्राफीवर नजर टाकल्यास त्याने आतापर्यंत 'उरी' (२०१९), 'धुरंधर' (२०२५) आणि 'धुरंधर २' (२०२६) यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय त्याने 'आर्टिकल ३७०', 'धूम धाम' आणि 'बारामुल्ला' यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि निर्मितीही केली आहे. आता त्याच्या या आगाम चित्रपटासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.