गायक अरिजीत सिंह आता 'दिग्दर्शक'; पहिल्याच चित्रपटात 'या' अभिनेत्रीच्या लेकीला दिली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:53 IST2026-04-14T11:52:24+5:302026-04-14T11:53:53+5:30
अरिजीतच्या सिनेमाची कथा नक्की काय?

गायक अरिजीत सिंह आता 'दिग्दर्शक'; पहिल्याच चित्रपटात 'या' अभिनेत्रीच्या लेकीला दिली संधी
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मात्र, आता अरिजीत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अरिजीतने चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून, त्याच्या पहिल्या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याचा खुलासा झाला आहे.
गायक ते आता दिग्दर्शक!
अरिजीत सिंहच्या या आगामी चित्रपटाची कथा तीन किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर आधारित असेल. हे तीनही तरुण वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. या चित्रपटाद्वारे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा सिद्दीकी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. शोरा या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून अरिजीत आणि शोरा या दोघांचाही चित्रपटसृष्टीतील हा नवा प्रवास असणार आहे.
चित्रपटाच्या निर्मितीबाबत अरिजीतने अत्यंत गुप्तता पाळली आहे. ही कथा अनेक दिवसांपासून त्याच्या मनात होती आणि त्यावर स्वतःच चित्रपट बनवून तो दिग्दर्शित करण्याचा निर्णय त्याने घेतला. कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी त्याने निर्मितीची धुराही स्वतःकडेच घेतली आहे. या चित्रपटाचा बराचसा लंडनमध्ये चित्रित करण्यात आला असून सध्या याचे पोस्ट-प्रोडक्शनचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
अरिजीतच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्याचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर: द रिवेंज' चित्रपटातील त्याच्या 'फिर से' या गाण्याला १५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. संगीताच्या दुनियेत आपली जादू दाखवल्यानंतर आता अरिजीत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून रुपेरी पडद्यावर काय कमाल करणार, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. अद्याप अरिजीत किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या प्रोजेक्टची चर्चा मात्र जोरदार रंगली आहे.