मोठी बातमी! अरिजीत सिंग आता चित्रपटांसाठी गाणार नाही; प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 21:11 IST2026-01-27T21:10:39+5:302026-01-27T21:11:17+5:30
Arijit Singh Quits Playback Singing news: अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता चित्रपटांत अरिजीतचा आवाज ऐकू येणार नाही. नेमका काय आहे अरिजीतचा निर्णय आणि कारण? वाचा सविस्तर वृत्त.

मोठी बातमी! अरिजीत सिंग आता चित्रपटांसाठी गाणार नाही; प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती
मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरिजीत सिंग याने एक अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावूक करणारा निर्णय घेतला आहे. अरिजीतने चित्रपटांसाठी गाणे सोडण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ही 'शॉकिंग' बातमी दिल्याने संगीत विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
अरिजीतने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर केला आहे. यात त्याने म्हटले की, "नमस्ते, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता मी इथून पुढे 'प्लेबॅक सिंगर' म्हणून कोणतेही नवीन काम घेणार नाहीये. मी हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अत्यंत सुंदर होता."
संगीत क्षेत्रावर काय होणार परिणाम?
अरिजीत सिंग हा सध्याच्या बॉलिवूड संगीताचा 'बॅकबोन' मानला जातो. त्याने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. चित्रपटांतून निवृत्ती घेत असली तरी, अरिजीत 'स्वतंत्र संगीत' आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण
'आशिकी २' मधील 'तुम ही हो' पासून सुरू झालेला हा जादुई प्रवास असा अचानक थांबेल, असे कोणालाही वाटले नव्हते. सोशल मीडियावर सध्या #ArijitSingh ट्रेंड होत असून, चाहते त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. अनेकांसाठी अरिजीतचा आवाज हा केवळ गाणे नसून ती एक भावना आहे.