चॉकेलटच्या आमिषापोटी लोकं सांगतात ‘पासवर्ड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 18:53 IST
कित्येक लोक तुम्हाला चॉकलेटच्या बदल्यात पासवर्ड सांगतील.
चॉकेलटच्या आमिषापोटी लोकं सांगतात ‘पासवर्ड’
आजच्या डिजिटल युगात ‘पासवर्ड’ म्हणजे घराची मुख्य चावी आहे. आपण आपल्या घराची चावी अशी कोणालाही देतो का? नाही ना?मग आपले इंटरनेट पासर्वड्सदेखील इतरांशी शेअर करायचे नसतात. पण तुम्हाला जर कोणाचा पासवर्ड माहीत करून घ्यायचा असेल तर तुम्ही हॅकर असण्याची गरज नाही.कारण कित्येक लोक तुम्हाला चॉकलेटच्या बदल्यात पासवर्ड सांगतील. अहो! असे आम्ही नाही, तर नवे संशोधन सांगतेय.लक्झबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी लोकांमधील नैतिक परस्परासहकार्याच्या वृत्तीवर अभ्यास केला. कोणी जर आपल्याविषयी काही चांगली गोष्ट केली तर त्याबदल्यात आपणही समोरील व्यक्तीसाठी काही तरी करावे अशी भावना म्हणजे नैतिक परस्परासहकार्य.परंतु याच भावनेमुळे आपली गोपनीय माहिती दुसऱ्यांना देण्यासाठी काही जण तयार होतात. आपण कशाप्रकारे लोकांना पासवर्ड सांगण्यासाठी राजी करून शकतो याचे अध्ययन करण्यासाठी संशोधकांच्या टीमने 1208 लोकांचा अभ्यास केला. त्यापैकी काहींना चॉकेलेट देऊन त्यांचा पासवर्ड विचारण्यात आला तर काहींना अभ्यासानंतर चॉकलेट दिले.ज्या लोकांना नंतर चॉकेलट दिले त्यांपैकी 29.8 टक्के लोकांनी तर आधी चॉकेलट दिलेल्या लोकांपैकी 43.5 टक्के लोकांनी आपला पासवर्ड सांगितला. याचा अर्थ की, काही तरी आमिष दाखवून किंवा दुसऱ्यांसाठी काही तरी चांगली गोष्ट करून तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करता आणि मग याच विश्वासामुळे लोकांना गोपनीय माहिती शेअर करण्यात काहीही गैर वाटत नाही.