परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:02 IST
मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत.
परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे
विद्यार्थी कोणत्याही इयत्तेचा असो, पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी पालकांचा पुढाकार महत्त्वाचा असतो. शाळादेखील विद्यार्थ्यांच्या गृहपाठासाठी पालकांना जबाबदार धरतात. यामुळे पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे गांर्भीयाने लक्ष द्यायला लागले आहेत. पूर्वी दहावी-बारावीची परीक्षा असेल तरच पालक त्याला मार्गदर्शन करीत असे. आता मात्र हे चित्र बदलले आहे. लवकरच पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होणार आहेत. मुलाच्या पहिल्या वगार्ची परीक्षा असेल तरी पालकांचा बीपी वाढलेला असतो.मुलाच्या प्रोगेस रिपोर्टमधील आकडे बेस्टच असावे, यासाठी ते आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांच्या अभ्यासावर मेहनत घेत असतात. नियमित गृहपाठ घेतात, पाठांतराच्या नव्या ट्रिक्स शिकवतात. या आणि अशाच पालकांच्या विशेष तयारीविषयी सीएनएक्सने मते जाणून घेतली. आधी दहावी-बारावीच्या परीक्षांशिवाय इतर कुठल्या परीक्षांचे टेन्शनच नसायचे. आता तसे नाही. मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत. पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल असमाधानी आहेत. निव्वळ घोकंपट्टी करून किंवा फक्त गाईडचा वापर करून केलेला अभ्यास आज पुरेसा नाही.मग विद्यार्थ्याने करायचे काय? अभ्यासाचे आव्हान पेलण्यासाठी निश्चय करणे महत्त्वाचे आहे. आपला स्वत:वर विश्वास असयला हवा. अभ्यास करण्यासाठी मन आणि बुध्दी यांचा समन्वय असायला हवा. मनाला पटते ते बुध्दीला पटावे लागते व बुध्दीला पटते ते मनाला पटावे लागते.बुध्दीचा निर्णय मनाला आवडणारा, सोयीस्कर न वाटला तर मन ते करायला तयार होत नाही. मन व बुध्दीचे एकमत होऊन निर्णय झाला तरी मनाच्या चंचल स्वभावामुळे त्याच्या इच्छा बदलत राहतात. हे पालकांनी आपल्या मुलांच्या लक्षात आणून देण्याची गरज निर्माण झाली आहे.