आता ‘व्हॉट्सअॅप’ वरही येणार डिजिटल पेमेंटची सुविधा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 15:07 IST
संपूर्ण देशात कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजिटल पेमेंटचे वारे वाहत असताना त्यात व्हॉट्सअॅपनेही पुढाकार घेत लवकरच या मॅसेंजरवर ‘डिजिटल पेमेंट’ची सुविधा येणार असल्याचे संकेत आहेत.
आता ‘व्हॉट्सअॅप’ वरही येणार डिजिटल पेमेंटची सुविधा !
संपूर्ण देशात कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजिटल पेमेंटचे वारे वाहत असताना त्यात व्हॉट्सअॅपनेही पुढाकार घेत लवकरच या मॅसेंजरवर ‘डिजिटल पेमेंट’ची सुविधा येणार असल्याचे संकेत व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्शन यांनी दिले आहेत. काही दिवसांपुर्वीच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला हे भारत भेटीवर होते. यात त्यांनी पंतप्रधानांसह विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. याच भेटीत त्यांनी आपल्या स्काईप या सेवेला ‘आधार’शी संलग्न करत याची ‘लाईट’ आवृत्ती लाँच केली. या पाठोपाठ आता व्हॉटसअॅपही डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मॅसेंजरचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्शन यांनी दिल्लीत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेत ‘डिजिटल इंडिया’ या मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी व्हॉटसअॅप लवकरच आपल्या भारतीय युजर्ससाठी ‘डिजिटल पेमेंट’ची सुविधा देणार असल्याचे जाहीर केले.व्हॉटसअॅपच्या एकुण १२० कोटींपैकी २० कोटींपेक्षा जास्त युजर्स हे भारतीय आहेत. यामुळे या मॅसेंजरने भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यावर लवकरच व्यावसायिक पध्दतीच्या संदेशांची सेवा येणार असून या माध्यमातून भारतातून बिझनेसची मोठी संधी आहे. तसेच अलीकडच्या काळात केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिल्यामुळे ‘डिजिटल पेमेंट’कडेही मोठ्या कंपन्यांचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमिवर व्हॉटसअॅपनेही यासाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत ब्रायन अॅक्शन यांनी दिले आहेत.