ई-बुक्सपेक्षा वाचकांना छापील पुस्तकांचीच अधिक गोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 22:39 IST
अमेरिकेतील प्रौढ वाचकांनी ई-बुक्सपेक्षा छापील पुस्तके वाचण्यास प्राधान्य देत असल्याचे बहुमताने मान्य केले.
ई-बुक्सपेक्षा वाचकांना छापील पुस्तकांचीच अधिक गोडी
इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रोजच्या जगण्याचे आयाम नव्याने रचले गेले. पुस्तकेदेखील त्याला अपवाद ठरली नाहीत. टेक्नोजगात ई-बुक्सचे आगमन झाले आणि छापील पुस्तकांचे आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असा समज पसरला; परंतु ‘प्यिऊ रिसर्च सेंटर’ने केलेल्या एका नव्या सर्वेक्षणातून हा समज खोटा ठरला.या सर्वेमध्ये अमेरिकेतील प्रौढ वाचकांनी ई-बुक्सपेक्षा छापील पुस्तके वाचण्यास प्राधान्य देत असल्याचे बहुमताने मान्य केले. सहभागी झालेल्या ६५ टक्के वाचकांनी पेपरबॅक/हार्डकव्हर बांधणीची पुस्तके गेल्या वर्षभरात वाचली आहेत तर ई-बुक्स वाचणाऱ्यांचे प्रमाण केवळ २८ टक्के इतके होते. ४० टक्के वाचक तर केवळ प्रिंट पुस्तके वाचणे पसंत करतात. त्या तुलनेत फक्त ६ टक्के वाचकांनी केवळ ई-बुक्स वाचत असल्याचे सांगितले. आॅडिओ बुक्स ऐकणाऱ्यांची संख्या यंदा मागच्या वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढली. सुमारे १४ टक्के सहभागी लोकांनी आॅडिओ बुक ऐकलेले आहेत.नऊ वर्षांपूर्वी जेव्हा अॅमेझॉनने सर्व प्रथम किंडल रीडर बाजारात आणले होते तेव्हापासून ई-बुकची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु अलीकडच्या काळात त्यांचा खप घटल्याचे दिसत आहे. ज्यांना केवळ ई-बुक वाचायला आवडते त्यापैकी १५ टक्के लोक टॅब्लेट कॉम्प्युटर (टॅब) वाचतात तर १३ टक्के मोबाईलवर. विशेष म्हणजे किंडल रीडरचा वापर केवळ आठ टक्के लोक करतात.मागच्या वर्षभरात १८ किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या ७३ टक्के लोकांनी किमान एक पुस्तक तरी वाचलेले आहे. पुरु षांपेक्षा (६८ टक्के) पुस्तक वाचण्याची वृत्ती महिलांमध्ये (७७ टक्के) अधिक असते. ७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या या टेलिफोनिक सर्व्हेमध्ये १५२० प्रौढ अमेरिकन लोक सहभागी झाले होते.