नैराश्य घालवण्यासाठी मेकअप करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:42 PM2017-08-19T16:42:52+5:302017-08-19T16:54:45+5:30

स्वत:ला अधिकाधिक सुंदर प्रेझेंट करणं, त्यासाठी स्वच्छ नीटनेटकं राहाणं मेकअप करणं यामुळे नैराश्यही दूर होतं असं अभ्यासांती सिद्ध झालं आहे.

Makeup helps for cure depression | नैराश्य घालवण्यासाठी मेकअप करा.

नैराश्य घालवण्यासाठी मेकअप करा.

ठळक मुद्दे* स्वत: स्वत:चे लाड करणं, स्वत:वर प्रेम करणं यासाठी मेकअपमधले अनेक पर्याय निवडल्यानं नैराश्यात फायदा होतो.* आणखी एका अभ्यासात असंही सिद्ध झालं आहे की, झोपण्यापूर्वी मेकअपचे व्हिडीओ पाहिल्यानं शांत झोप लागते.* स्वत:ची प्रतिमा स्वत:च्या नजरेत उंचावण्यासाठी मेकअप हे सकारात्मक अस्त्र असल्यासारखं वापरता येऊ शकतं.


- मोहिनी घारपुरे-देशमुख

‘शी.. तुम्ही मुली भसाभस मेकअप काय करता?’ असं घरातल्या वडीलधा-यापैकी कोणी ना कोणी म्हटल्याचा अनुभव आपल्याकडील अनेक मुलींना आला असेलच. किंवा याउलट तुमच्या ग्रुपमधली एखादी तरी मुलगी मेकअप करण्याच्या, पार्लरमध्ये जाण्याच्या विरोधात असलेलीही तुम्हाला माहीत असेल. मात्र, अशा सगळ्या लोकांना आता तुम्ही नक्कीच उत्तर देऊ शकता. याचं कारण, मेकअपमुळे नैराश्य दूर होण्यास मदत होते असे या विषयातील अभ्यासकांनीच लक्षात आणून दिलय.

आजवर मेकअप किंवा फॅशनला फॅड असं म्हटलं जायचं परंतु नव्या काळात मेकअपमुळे एकंदरीत व्यक्तिमत्त्वात आपसुकच आत्मविश्वास निर्माण होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्वत:ला अधिकाधिक सुंदर प्रेझेंट करणं, त्यासाठी स्वच्छ नीटनेटकं राहाणं मेकअप करणं यामुळे नैराश्यही दूर होतं असं अभ्यासांती सिद्ध झालं आहे.
नैराश्य ही अशी मनोवस्था आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला काही ना काही उमेद देणा-या गोष्टींच्या, घटनांच्या सान्निध्यात यावं लागतं. जे लोक या मनोवस्थेला सामोरे जात असतात, त्यांच्या मनात स्वत:शीच एक प्रचंड झगडा सतत सुरू असतो. अगदी तसंच चिंताग्रस्त माणसांसाठी तर एकेक दिवस अत्यंत कठीण मनोवस्था असते. अशावेळी, आत्मविश्वासही डळमळीत झालेला असतो. त्यामुळे स्वत:ची प्रतिमा स्वत:च्या नजरेत उंचावण्यासाठी मेकअप हे सकारात्मक अस्त्र असल्यासारखं वापरता येऊ शकतं.

स्वत: स्वत:चे लाड करणं, स्वत:वर प्रेम करणं यासाठी मेकअपमधले अनेक पर्याय निवडल्यानं फायदा होतो. जसे मसाज करणं, झोपण्यापूर्वी डोक्याला सुगंधी तेलानं मालिश करणे, हातापायांना एखादे क्रीम लावणं असे अनेक पर्याय आहेत.

 

न्यूयॉर्कस्थित डर्मेटोलॉजिस्ट आणि सायिकएट्रीस्ट एमी वेचस्लर सांगतात, नैराश्यातून जात असणा-या लोकांचे नेहमीच वैयक्तिक स्वच्छता आणि स्वत:ची काळजी या दोन्हीही मुद्द्यांकडे सहजगत्या दुर्लक्ष होतं. याचं कारण त्यांना या दोन्हीही गोष्टीत रस उरलेला नसतो, नैराश्य हेच याचं कारण आहे. त्यामुळे जसजशी त्यांच्यात या दोन्हीही गोष्टींबाबत पुन्हा उत्सुकता निर्माण होते तसतसे त्यांच्यात हळूवारपणे सकारात्मक बदल होत असल्याचं दिसतं.

नैराश्यग्रस्त माणसांचे त्यांच्या स्वत:कडे आपोआपच साफ दुर्लक्ष झालेलं असतं. विशेषत: केसांची आणि त्वचेची निगा राखणं,चांगले कपडे घालणं याबद्दल त्यांच्या मनात औदासिन्यच असतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्या जीवनात पूर्ववत आनंदानं सहभागी व्हावं असं वाटत असेल तर हे काही प्राथमिक बदल त्यांनी करायला हवेत असे त्या सांगतात.

आणखी एका अभ्यासात असंही सिद्ध झालं आहे की, झोपण्यापूर्वी मेकअपचे व्हिडीओ पाहिल्यानं शांत झोप लागते. विशेषत: डोळ्यांचा मेकअप करतानाचा व्हिडीओ, गालावर ब्लशआॅन करतानाचा व्हिडीओ, लिपस्टिक लावतानाचा व्हिडीओ पाहून झोपल्यास छान, सुखद, आरामदायी झोप लागते. याचं कारण, दुस-याच्या चेह-यावर मेकअप चढवला जाताना ब्रशेसच्या सहाय्यानं दिले जाणारे स्ट्रोक्स हे आपल्यालाही तितकाच आराम देत असतात.

त्यामुळे मेकअपला फॅड, चमकोगिरी, टाइमपास अशी लेबल लावण्याऐवजी मेकअपमधल्या क्रीयांबद्दल एक नवा दृष्टीकोन बाळगायला हवा असं सांगावंसं वाटतं. इट्स नॉट अबाऊट ब्यूटी प्रॉडक्ट्स, बट इट्स आॅल अबाऊट हॅप्पीनेस, कॉन्फीडन्स अ‍ॅण्ड रिलॅक्सेशन ...

Web Title: Makeup helps for cure depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.