‘फेसबुक’द्वारे अंतराळवीरांशी ‘लाईव्हचॅट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 19:59 IST
भूतलावरील व्यक्तिंचा संवाद आपसात व्हावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून
‘फेसबुक’द्वारे अंतराळवीरांशी ‘लाईव्हचॅट’
भूतलावरील व्यक्तिंचा संवाद आपसात व्हावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाºया ‘फेसबुक’ने बुधवारी एक आगळावेगळा प्रयोग करीत अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांशी संवाद साधण्याची संधी युजर्सना प्राप्त करून दिली होती. स्पर्धेच्या युगात तग धरावा आणि लोकप्रियतेत सातत्य ठेवण्यासाठी ‘फेसबुक’तर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. अलिकडेच ‘थ्रीडी व्हिडिओ’ सारख्या काही कल्पनाही फेसबुकने सादर केल्या आहेत. अशाच नाविन्यपूूर्ण कल्पनेचा एक भाग म्हणून बुधवारी ‘नासा’ने अंतराळात पाठवलेल्या अंतराळवीरांशी ‘फेसबुक’ने युजर्सचा संवाद घडवून आणला. ‘सोयुझ’ या अंतराळयानातील जेफ विल्यम्स, टिम कोप्रा, टीम पिके या तीन अंतराळवीरांशी संवाद साधण्यात आला.फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या वॉलवर अंतराळातील ‘लाईव्ह’ व्हिडिओ उपलब्ध करून दिला. तसेच त्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या काही मिनिटांतच हजारो प्रश्न विचारण्यात आले. अंतराळवीरांशी संवाद सुरू असताना जगभरातील २० लाख युजर्स हा ‘लाईव्ह’ व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आले आहे.