सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धक चित्रपटांची यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:34 IST
इंडिपेंडंट चित्रपटांचे माहेरघर म्हणून सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची ओळख आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात...
सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धक चित्रपटांची यादी जाहीर
इंडिपेंडंट चित्रपटांचे माहेरघर म्हणून सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची ओळख आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील पार्क सिटी, उटाह येथे होणार्या या चित्रपट महोत्सवात जगभरातील इंडिपेंडंट दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवण्यात येतात. जानेवारी २0१६ मध्ये होणार्या महोत्सवात दाखविण्यात येणार्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. गुलामगिरीवर भाष्य करणार्या चित्रपटांपासून ते समलैंगिक लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकणार्या दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.महोत्सवाचे प्रोग्राम डिरेक्टर जॉन कूपर यांनी माहिती दिली की, अमेरिका आणि इतर अनेक देशांतील चित्रपटांची निवड यासाठी करण्यात आली आहे. इंडिपेंडंट सिनेमांची निर्मिती आता वाढू लागली आहे. मोठय़ा स्टुडिओज्ची मक्तेदारी मोडून नव्या आवाजांना, नव्या कथांना लोकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हे फिल्ममेकर्स करत आहे. सनडान्स त्यांना व्यासपीठ मिळवून देते.महोत्सवाचे यावेळी खास आकर्षण म्हणजे गुलामगिरीवर आधारित ऐतिहासिक चित्रपट 'द बर्थ ऑफ अ नेशन' हे आहे. नेट पार्कर याने याचे दिग्दर्शन केले आहे. त्याबरोबरच कोरियाहून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पीढीचा सांस्कृतिक संघर्ष 'स्पा नाईट'मधून दिसणार आहे. विविध विषयांवरील अनेक डॉक्युमेंटरीज्सुद्धा यावेळी पाहायला मिळणार आहेत.