- सारिका पूरकर-गुजराथी
घर सजावट म्हटली तर ती वॉल हॅँगिंगशिवाय कशी पूर्ण होणार? या वॉल हॅँगिंग्जमुळेच घराला कलात्मक टच देता येतो. या वॉल हॅँगिंग्ज सहसा हस्तकलेच्या सुंदर आविष्कारातून साकारलेल्या असतात. आणि हस्तकला म्हटली की त्यात सौंदर्य हे असतंच. वॉल हँगिंगमधलं सौंदर्य हे घराला सजवतं आणि पाहणाऱ्याच्या डोळ्याला आनंदही देतं.
बंजारा कच्छ मिरर वर्क
बंजारा समजाची ही पारंपरिक भरतकाम कला. आरसे , रंगीत रेशमी, सुती धागे यांच्या सहाय्यानं कच्छी टाक्यानं हे भरतकाम केलं जातं. चौकडा नावानंही हे डिझाईन लोकप्रिय आहे. या भरतकामाच्या सहाय्यानं चौकोनी, गोलाकारात वॉलहॅँगिंग बनवले जातात. कापडावरील हे भरतकाम फ्रेम करुन भिंतीवर लावता येतं. अतिशय आकर्षक आणि हस्तभरतकामाचा हा आविष्कार आजही लोकप्रिय आहे. गडद रंगसंगतीतील वॉल हॅँगिंग भिंतीला आणि घरालाही ब्राईट, व्हायब्रंट लूक देतं.
ज्यूट वॉलहॅँगिंग
ज्यूटच्या धाग्यांपासून तसेच सुती धाग्यांपासून हातमागावर डिझाईन्स विणून हे वॉलहॅँगिंग बनवले जातात. मोठ्या आकारातील हे वॉलहँगिंग हातमाग विणकरांचं कलाकौशल्य प्रतिबिंबिंत करतं. दिसायला अत्यंत सुंदर आणि वेगवेगळ्या पारंपरिक ते मॉर्डन डिझाईन्स यात उपलब्ध असल्यामुळे ही वॉलहॅँगिंग प्रत्येक इंटिरिअर डेकोरेटरची पहिली पसंती असते.
मॅट वॉलहॅँगिंग
बांबूच्या काड्यांपासून बनवलेल्या मॅट (चटई) वॉल हॅँगिंगनंही भिंतींना बोलतं करता येतं. लहान-मोठ्या आकारातील या मॅट्सवर पक्ष्यांची चित्रं कधी निसर्गदृष्यं चितारलेली असतात. त्यामुळेही सजावटीला फ्रेश, नॅचरल आणि गो ग्रीन टच मिळतो.
मेटल वॉलहॅँगिंग्ज
मेटलची वॉलहॅँगिगही खूप व्हरायटीत उपलब्ध आहेत. सूर्याच्या आकारातील किंवा वास्तुशास्त्रानुसार मिळणारी मेटल वॉलहॅँगिग लोकप्रिय ठरले आहेत. तसेच झाडं, पानं फुलं, पक्ष्यांची रचना असलेली तांब्या-पितळी धातूची वॉल हॅँगिंगही सजावटीचा मुख्य पर्याय म्हणून वापरली जात आहेत.
म्युरल्स
मोठ्या आकारातील सिरॅमिक थ्री डी म्युरल हा वॉल हॅँगिंगचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार ठरला आहे. निसर्गचित्रं ग्रामदृष्यं, देवी-देवतांच्या प्रतिकृती, वास्तुशास्त्र म्युरल वॉल हँगिंग हा स्टेटस सिम्बॉलही ठरत आहेत. अत्यंत नाजूक कलाकुसरीच्या या मुरल्सनं घराच्या सजावटीला खऱ्या अर्थानं चारचांद लागतात.
मॅक्रम वॉल हॅँगिंग
मॅक्रमच्या रेशमी आणि सुती धाग्यांना विविध प्रकारच्या गाठींच्या सहाय्यानं विणून हे वॉल हॅँगिग बनतं. असंख्य डिझाईन्स, रंगसंगतीत ते उपलब्ध आहेत. या वॉल हॅँगिंगमुळे पारंपरिक कलेला जोपासल्याचा आनंदही मिळतो. शिवाय या वॉल हंँगिगचा लूक एव्हरग्रीनच असतो. ग्रीन वॉलहॅँगिंग निसर्गाकडे चला अशी साद देणारं हे वॉलहॅँगिग. छोटे इनडोअर प्लाण्ट्स पारदर्शक काचेच्या जारमध्ये ठेवून भिंतीवर या जारसची आकर्षक रचना केल्यास एक आकर्षक वॉलहॅँगिंग बनतं. दिसायला फ्रेश आणि भिंतीला सतत एक सजीव अनुभूती देणारं हे वॉलहॅँगिग भिंतीवर असायलाही हरकत नाही.