दीपिकाच्या प्रेरणेने तो चढला एव्हरेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:26 IST
मानसिक आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी यंदा मी शिखर चढलो.
दीपिकाच्या प्रेरणेने तो चढला एव्हरेस्ट
शीर्षक वाचून तुम्हाल वाटले असणार की, दीपिका पदुकोणचा कोणी तरी ‘डाय हार्ड’ फॅन असणार ज्याने दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. परंतु ते तसे नाही.मेक्सिकोचा डेव्हिड लिआनो जेव्हा मागच्या वर्षी भारतात मोटरसायकल ट्रीपसाठी आला होतो तेव्हा त्याला दीपिकाच्या ‘लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन फॉर मेन्टल हेल्थ’ या संस्थेविषयी कळाले.मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे काम बेंगलोरस्थित ही संस्था करते.स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना तणाव, नैराश्य, बायपोलर डिसआॅर्डर अशा मानसिक आजरांनी त्रस्त झालेले जवळून पाहिल्यामुळे लिओनने या संस्थेला मदत करण्याचे ठरविले. मदत म्हणजे देणगी नाही.या पठ्याने संपूर्ण जगाचे लक्ष या समस्येकडे वळविण्यासाठी माउंट एव्हरेस्ट शिखरच सर केले. 12 मे रोजी त्याने ही कामगिरी केली. यावेळी त्याने दीपिकाच्या संस्थेचे बॅनरहीसोबत नेले होते.एव्हरेस्टवर पाऊल ठेवण्याची लिआनोची ही सहावी वेळ आहे. आॅक्सिजन टँकशिवाय त्याने यावेळी ही कामगिरी करून दाखविली. शिखरावर काढलेल्या सेल्फी व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, पुन्हा एकदा एव्हरेस्ट सर केल्याचा खूप आनंद आहे. मानसिक आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी यंदा मी शिखर चढलो. तुमच्या आसपास कोणी जर या समस्येने ग्रस्त असेल त्यांना आधार द्या. त्यांचे आयुष्य तुम्ही सुधारू शकता. लिओनने आतापर्यंत सर्व खंडांतील सर्वोच्च शिखरे पादक्रांत केलेली आहेत. त्याच्या पॅशनविषयी बोलताना तो सांगतो की, अशाप्रकारचे साहस करण्यामागे स्वत:चा स्वार्थ दडलेला असतो. परंतु एखाद्या चांगल्या कामासाठी अशी कामगिरी केल्याचा आनंद निराळा आहे.