- सारिका पूरकर-गुजराथीकिचन. गृहिणींची हक्काची जागा. दिवसातील सर्वात जास्त वेळ त्या येथेच घालवतात. किचनमधील प्रत्येक वस्तूशी त्यांची एक खास अटॅचमेंट असते. शिवाय नोकरदार महिलांनाही थोडा वेळ का होईना पण किचनमध्ये घालवावा लागतोच ! त्यामुळे या किचनला केवळ स्वयंपाक करण्यापुरतीची जागा इतकीच मान्यता न देता या खोलीलाही घरातील अन्य खोल्यांप्रमाणे सजावटीसाठी प्राधान्य द्यायला हवं. तसं हल्ली मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, चिमणी याद्वारे तसा प्रयत्न होताना दिसतोय. पण हे झाली मोठ्या किचनची गोष्ट. ज्यांचं किचन लहान आहे, तेथे फ्रीज, टेबल, किचन ओटा यामुळे जास्त जागाच उरत नाही अशा किचनलाही ठरवलं तर छान सजवता येतं. काही साध्या-सोप्या ट्रिक्स वापरुनही किचनला फ्रेश ठेवता येतं. तुमच्याकडे ज्या वस्तू आणि जेवढी जागा उपलब्ध आहेत, त्या वापरुनच किचन सजवता येतं.
किचन कसं सजवाल?१) किचनमधील लाकडी कपाटांना रंगवून टाका. शक्यतो ब्राईट आणि बोल्ड रंग असायला हवेत. त्यामुळे कपाटं नवे दिसू लागतील. हा सर्वात सोपा पर्याय आहे, किचनमधील फर्निचरला न्यू लूक द्या. काही कपाटांच्या दरवाजांवर फेब्रिक पॅॅनल बनवू शकता. तुमच्याकडील फ्लोरल, जयपूरी प्र्रिंटच्या जुन्या चादरींचे चौकोनी तुकडे कापून ते दरवाजांवर लावा आणि अवतीभोवती लाकडी फ्रेम्स बसवून घ्या. हे दिसायला एकदम छान दिसेल. फक्त त्यासाठी रंग जरा जपून निवडावे लागतात. २) किचनमध्ये वापरायच्या नॅपकिन्सचेही रंग बदलून टाका. छान ब्राईट कलर्सचे नॅपकिन्स फ्रीज हॅण्डलवर, किचन ओटयाजवळील नॅपकिन होल्डरवर, किचनमधील बेसिनजवळ टांगा. ३) किचनमधील स्टील डब्यांचेही थोडे वेगळे आकार ट्राय करुन आकर्षक मांडणी करा. स्टील वापरायचे नसेल तर बाजारात विविध प्रकारात आकर्षक कंटेनर्स मिळतात, ते वापरुन सुंदर मांडणी करता येते. ४) वेताच्या बास्केट्स, काही आकर्षक बाऊल्स किंवा अन्य डेकोरेटिव्ह कंटेनर्स डायनिंग टेबल, फ्रीजच्या टॉपवर, किचन ओट्यावर मांडून ठेवा. यात तुम्ही सिझनल फळांची मांडणी करु शकता. फ्रेश, कलरफूल फळांमुळेही किचनला फ्रेश लूक येईल.५) किचनमधील कपाटांचे, ड्रॉव्हर्सचे हॅण्डल देखील छान डेकोरेट करता येऊ शकतील. त्यासाठी त्यांना सुतळी धागा गुंडाळून घ्या. किंवा कलरफूल प्लॅस्टिक फिटिंग करुन घ्या. तुम्ही पितळी हॅण्डल्स बसवून अॅण्टिक लूकही देऊ शकता.६) भांडे घासण्याचे स्क्रबर, स्पंज ठेवण्यासाठी जुने श्रीखंडाचे कंटेनर घेऊन त्यास रंगवून घ्या. त्यावर पोलका डॉटचे डिझाईन किंवा वाशी टेप लावून आकर्षक डिझाईन बनवून वापरा. ७) किचनच्या खिडकीवर मोकळी जागा असेल तर तेथे तुम्ही छोटेसं इनडोअर प्लाण्ट, फ्लॉवर वासे, बर्ड फीडर ठेवू शकता. स्वयंपाक करता-करता अशा गोष्टींकडे पाहिलं तरी छान वाटतं. निसर्गाशी तुम्ही जोडल्या जाल. खिडकी देखील जिवंत होईल.८) फ्रीजवर आकर्षक मॅग्नेट्स वापरुन किंवा त्याला रंगवून, त्यावर पेंटिंग करुनही डेकोेरेट करु शकता. फॅमिली फोटोज देखील यावर लावून पर्सनल टच देता येईल.