-गिरीश राऊत,निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ,भारतीय पर्यावरण चळवळ / वसुंधरा आंदोलन
आज कोरोना विषाणूचा मानवाला संदेश आहे. पुन्हा पृथ्वीशी जोडून घ्या. कृषियुगात जा. तरुणांनो नोकरी मागू नका. एक ते दीड एकर शेतजमीन सरकारकडे मागा. कारण कोरोना, कॅन्सर व अवकाळी, गारपीट, वादळे घडवणारी तापमानवाढ, हवामान बदल इत्यादी संकटे औद्योगीकरणामुळे आली आहेत. सरकारकडे एमआयडीसीकडे जमीन मुबलक आहे. शेतकरी वा इतर खाजगी जमीन मालकांनो, आपल्या अन्नपोषणाच्या क्षमतेपेक्षा जास्त जमीन बाळगणे हा मानवजात व जीवसृष्टीविरुद्ध केलेला गुन्हा आहे, पाप आहे. मानवजात धोक्यात आहे. अधिकची जमीन जंगलांना व औद्योगीकरण सोडून शेती करू इच्छिणारांना द्या. विनोबांनी भूदान चळवळ केली होती. आज भूदान म्हणजे मानवजातीला जीवनदान आहे.
भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५ मध्ये भारतात पाठवले. हॉवर्ड हे कोपर्निकस, ब्रुनो व गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या परंपरेतले खरे शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीयांच्या शेतीविषयी कुतूहल होते. त्यांनी ठरवले की, प्रथम भारतात फिरून हा कृषिप्रधान देश हजारो वर्षे शेती कशी करतो ते पाहू. ते पाच वर्षे भारतात विविध ठिकाणी फिरून शेती समजून घेत होते. ते त्यांच्या ‘अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ या ग्रंथात म्हणतात, ‘भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून मी शिकलो की, निसर्ग हा खरा शेतकरी आहे. एकाच खाचरात जमिनीचा कस वाढता ठेवून हजारो वर्षे शेती करणे भारतीयांकडून शिकावे. ते मिश्र व फिरती पिके घेतात. या पद्धतीची जाण आम्हा ब्रिटिशांना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, सन १८८९ पर्यंत माहीत नव्हती.’ हॉर्वर्ड पुढे लिहितात ‘रसायन हे खत नसून विष आहे, ते पिकांचे अन्न नाही.’ हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आजही तो शेतीविषयक प्रमाणभूत मानला जातो. हॉवर्ड यांचे भाकीत की, ‘यंत्राची भूक पृथ्वी भागवू शकणार नाही’, हे आज खरे ठरले आहे. डॉ. अल्बर्ट हॉवर्ड यांनी वनस्पती व प्राणी यांच्या कुजण्यातून ‘ह्युमस’ निर्मितीतून अनेक पिकांबाबत शेती उत्पादनात काही पट वाढ करून दाखवली होती. त्यांचा वरील ग्रंथ सन १९४० मध्ये प्रथम लंडनमध्ये प्रकाशित झाला होता. सन १९५६ पर्यंत त्याच्या सात आवृत्त्याही निघाल्या होत्या. त्यांनी यंत्र व रसायनांचा शेतीत प्रवेश करण्यातील धोका दाखवला असूनही स्वतंत्र भारतात स्वामिनाथनसारख्या कुठलीही प्रतिभा नसलेल्या, कंपन्यांच्या शेतीतील हितसंबंधाचा पुरस्कार करणाºया, स्वत: शेती न करणाºया सुमार माणसांच्या नावाचे वलय निर्माण केले गेले. भारतीय शेतकºयांचे व शेतीचे वाटोळे करण्याचे ब्रिटिशांना न जमलेले काम या स्वामिनाथनांनी करून दाखवले. करोडो भारतीयांना विषारी अन्नाद्वारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविण्याचे महापाप त्यांनी केले. ‘स्वामिनाथन’ हे स्वत: जणू एक औद्योगिक, कृत्रिम उत्पादन आहेत. ही भारतीयांत रुजलेली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारी एक दांभिक प्रवृत्ती आहे. भारतीयांना कायमचे गुलाम बनवण्याचे मेकॉलेचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले. भारतात ब्रिटिशांना हवी तशी माणसे शिक्षणाने घडवली व स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश अंमल अशा प्रकारे चालू राहिला.
शेतकरी हजारो वर्षे भुकेसाठी अन्न पिकवत होते. जसे की, ते इतर प्राणिमात्रांसाठी असते. मात्र, हरित क्रांतीने बाजारासाठी धान्य पिकवण्याची कल्पना रुजवली. त्यातून दुप्पट, तिप्पट उत्पादनाद्वारे मोठे उत्पन्न मिळवण्याची इच्छा आली. पूर्वी अन्न उत्पादन हा हेतू होता. आता पैशांचे उत्पन्न हा हेतू बनला. हे हवा व पाण्यांप्रमाणे असलेली अन्न ही मूलभूत गरज भागवण्यासाठी नव्हते. उलट, असा शहरी समाज वाढवला जात आहे, जो हवा, पाणी व अन्न एव्हढ्याच इतर प्राणिमात्रांप्रमाणे आपल्या गरजा आहेत हे विसरून गेला आहे. त्या सहज भागत असल्याने कृत्रिमरीत्या उद्योगातून बनलेल्या असंख्य वस्तू चलनाद्वारे मिळविण्याच्या मागे लागला आहे. त्याला ‘आधुनिक जीवनशैली’ असे गोंडस नाव दिले आहे. हा उदरनिर्वाह नाही. कार, टीव्ही, संगणक, मोबाईल इत्यादी वस्तुनिर्वाह आहे. मात्र, यांना जगवणारा, मूलभूत गरज असलेले अन्न पिकवणारे शेतकरी मात्र, यांच्या एखाद्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमी रकमेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करू लागले. अशी विषम बेगडी व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करीत नाही. समाजदेखील ही खोटी, अन्यायकारक, अशाश्वत व्यवस्था बंद करू, असे म्हणत नाही. कर्जमाफी, खत, वीज, पाणी, बियाणे घरे इ. फुकट किंवा सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी मागण्या होत आहेत. मरत असलेल्या शेतकºयांना कर्जमाफी तर हवीच; परंतु खते, वीज, पाणी, बियाणी कशाला? यामुळे तो पुन्हा औद्योगिकीकरणाने निर्माण केलेल्या सापळ्यात अडकतो. यापूर्वी हजारो वर्षांत त्याने अशा मागण्या त्या वेळच्या सत्ताधारी राजांकडे केल्या नव्हत्या. तो स्वावलंबी, स्वतंत्र होता. तोच राजा होता. त्याच्या गावांच्या स्वयंपूर्णतेमुळे भारतात स्वराज्य होतेच.