नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी रात्री जीएसटी दरात कपातीची घोषणा केली. या नव्या टॅक्स प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितले. जीएसटी परिषदेने ५ टक्के आणि १८ टक्के या २ टॅक्स स्लॅबला मंजुरी दिली. नवीन जीएसटी स्लॅब येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या उपयोगी येणाऱ्या वस्तूंवरील १८ आणि १२ टक्के जीएसटी स्लॅब हटवून तो ५ टक्के इतका केला आहे. हेअर ऑयल, टॉयलेट, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर, किचनवेअर आणि अन्य घरगुती सामानांवर ५ टक्के जीएसटी कर लावण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले. जीएसटी कपातीमुळे शाळेतील पुस्तके, पेन, पेन्सिल, नोटबुक, रबर, शार्पनर आणि स्टेशनरी वस्तू स्वस्त होणार की नाही हे जाणून घेऊया.
'या' वस्तूंवर १२ टक्क्यांहून शून्य टॅक्स
GST च्या नव्या स्लॅबमुळे एक्सरसाइज बुक, ग्राफ बुक आणि लॅब नोटबुक खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जुन्या स्लॅबनुसार या वस्तू खरेदीवर १२ टक्के कर द्यावा लागत होता परंतु आता शून्य कर आहे. कॉपी, एक्सरसाइज बुक, ग्राफ बुक आणि लॅब नोटबुक खरेदीवर ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार नाही. सोबतच पेन्सिल, शार्पनर, पेन यावरही ग्राहकांना १२ टक्के जीएसटी द्यावा लागायचा, परंतु त्यावर आता पूर्ण सूट दिली आहे.
सोबतच मॅथेमॅटिकल बॉक्स, ज्योमेट्री बॉक्स, कलर बॉक्सचा वापर करत असेल तर नव्या जीएसटी स्लॅबने या खरेदीवरही बचत होणार आहे. या वस्तूंवर आधी १२ टक्के जीएसटी आकारला जात होता परंतु आता ग्राहकांना ५ टक्के जीएसटी द्यावा लागेल. शाळेत लागणारी स्टेशनरी ज्यात पेन, पेन्सिल आणि इतर छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे. त्या खरेदीवर ५ टक्के कर आकारला जाईल. चारकोल स्टिक, जी स्केचिंगसाठी आणि ड्रॉईंगसाठी वापरली जाते तेदेखील स्वस्त होणार आहे. सर्वात मोठा बदल नोटबुक्समध्ये वापरण्यात येणारे पेपरबाबत आहे. ग्राहकांना यावर १८ टक्के कर द्यावा लागत होता, तो आता १२ टक्क्यांवर आला आहे. वही, पुस्तके छपाईसाठी लागणाऱ्या खर्चावर त्याचा परिणाम होईल. शालेय वस्तूंवरील जीएसटी दर कपात झाल्याने या वस्तू स्वस्त होणार आहेत.
फीमध्ये होणार बदल?
नव्या जीएसटी स्लॅबमध्ये शाळेच्या फीमध्ये काही बदल झाला नाही. प्राथमिक शिक्षण सध्या जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. परंतु उच्च शिक्षण, प्रोफेशनल कोचिंग आणि ऑनलाईन कॉर्सेसवर आजही १८ टक्के जीएसटी लागू आहे.