आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि घरापर्यंत सामान पोहोचवण्यात डिलिव्हरी बॉयची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. ऊन असो किंवा पाऊस, हे लोक बाईकवर मोठ्या बॅगा घेऊन रस्त्यावर धावताना दिसतात. या कामातून डिलिव्हरी बॉयला किती पगार मिळतो? एक पार्सल पोहोचवण्यासाठी त्यांना किती पैसे मिळतात? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
आजतकने ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनच्या एका डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधला, जो गेल्या अनेक वर्षांपासून नोएडाच्या फिल्म सिटी, सेक्टर १८ आणि १६ सारख्या मुख्य सेक्टरमध्ये पार्सल पोहोचवतो. या डिलिव्हरी बॉयने त्याची मासिक कमाई आणि इतर सुविधांबद्दल माहिती दिली. पार्सल हरवल्यास किंवा तुटल्यास कोण पैसे देते, याबद्दलही त्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयला एका पार्सलसाठी १२ रुपये मिळतात. काही भागांत १०० हून अधिक डिलिव्हरी पार्सल केल्या जातात, अन्यथा एक डिलिव्हरी बॉय दिवसाला जवळपास ८० पार्सल डिलिव्हरी करतो. कोणत्या डिलिव्हरी बॉयला किती पार्सल द्यायचे? हे कंपनी ठरवते. एखादा डिलिव्हरी बॉय उत्तम काम करत असेल तर, त्याच्यावर अधिक पार्सल डिलिव्हरी करण्याची जबाबदारी दिली जाते. दरम्यान, मिंट्राचा डिलिव्हरीने सांगितले की, त्याला एका पार्सलसाठी १४ रुपये दिले जातात. कधी-कधी दोन रुपयांचा इन्सेंटीव्ह मिळतात. बहुतेक पार्सलवर १६ रुपये मिळतात.
पार्सल हरवले किंवा खराब झाले तर काय?
डिलिव्हरी दरम्यान कोणतेही पार्सल तुटले किंवा वस्तू हरवली तर डिलिव्हरी बॉयला त्याची पूर्णपणे भरपाई करावी लागते. जर ८०० रुपयांची कोणतीही वस्तू हरवली तर डिलिव्हरी बॉयला कंपनीत ८०० रुपये जमा करावे लागतात. जर काही तुटले असेल तर ते बदलावे लागते. कंपनीकडून पार्सल घेताना ते आतून तुटलेले आढळले तर ते परत करू शकतो आणि ते डिलिव्हरी करण्यास नकार देऊ शकतो.