शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांचा ‘मिस्टर जोशी!’

By admin | Updated: March 27, 2016 00:27 IST

नाटक आणि लहान मुले या जगातील सर्वांत सुंदर गोष्टींपैकी दोन गोष्टी आहेत. आणि या दोन गोष्टी मला फार प्रिय आहेत. त्यामुळे लहान मुलांना नाटक शिकविण्याची तीव्र इच्छा मला नेहमीच होती.

(महिन्याचे मानकरी)- सुव्रत जोशीनाटक आणि लहान मुले या जगातील सर्वांत सुंदर गोष्टींपैकी दोन गोष्टी आहेत. आणि या दोन गोष्टी मला फार प्रिय आहेत. त्यामुळे लहान मुलांना नाटक शिकविण्याची तीव्र इच्छा मला नेहमीच होती. सुदैवाने तशी संधी मला दिल्लीतील ‘वसंत व्हॅली स्कूल’मध्ये मिळाली.शाळेत नाटकांचे वर्ग मात्र अगदी पारंपरिक पद्धतीने चालत असल्याचे लक्षात आले. म्हणजे बरेचदा शिक्षणात नाटकाचा वापर हा विद्यार्थ्यांना चालण्याची, बोलण्याची शिस्त लावण्यासाठी केला जातो. मला हा प्रकार अजिबात पटत नाही. किंबहुना आपल्या शिस्तबद्ध जीवनातून आपले मन मोकळे करण्याचे, प्रसंगी ती शिस्त मोडायला उद्युक्त करण्याचे काम नाटक करते. हे सर्व मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे होते. त्यासाठी मी आधीच्या नाट्यशिक्षणाचा अभ्यासक्रम आणि त्याची पद्धत यात आमूलाग्र बदल करण्याची सूचना मुख्याध्यापिकांना केली आणि त्यांनीही ती स्वीकारली. मग मोकळे आकाश मिळाले. ज्यात मी अनेक प्रयोग करून पाहिले.वसंत व्हॅली ही भारतातील क्रमांक १ची शाळा. तिथले विद्यार्थी अभ्यास, खेळ, वक्तृत्व, संगीत, चित्रकला, नृत्य, नाटक, सामाजिक भान या सर्वच बाबतींत अग्रेसर आहेत. आणि या सगळ्यांचे शिक्षण त्यांना शाळेतच दिले जाते. याविषयी मला तिथे जाईपर्यंत मात्र काही कल्पना नव्हती. पण मी ज्या दिवशी पहिल्यांदा गेलो तेव्हा मला जिथेतिथे मुक्त फिरणारी, हसणारी, खेळणारी, गाणारी, नाचणारी आणि तितक्याच हसऱ्या चेहऱ्याने अभ्यासही करणारी मुले दिसली. किती शाळांतून असे चित्र दिसते? बरेचदा तोंड पाडून आपल्या मनाविरुद्ध काहीतरी खूप कष्टाने करणारे चेहरेच आपल्याला बहुतेककरून शाळांमध्ये दिसतात. अशा या शाळेतले शिक्षकही मला सतत आनंदीच दिसले. त्यांच्या कामावर किती प्रेम असणारे आणि विद्यार्थ्यांविषयी तळमळीने काम करणारे.‘वसंत व्हॅली’सारख्या शाळा खरोखरच भारतात फारच दुर्मीळ आहेत. इथे इतर विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण, भारतीय संगीत, पाश्चात्त्य संगीत, पाश्चात्त्य नृत्य, भारतीय नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि नाटक यासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. अभ्यासाबरोबरच या कलांचे शिक्षण नर्सरीपासून सुरू केले जाते. हे सर्व शिक्षक एकमेकांबरोबर समन्वय साधूनच काम करतात. शिक्षकांच्या खोलीत एक तक्ता असतो. यावर प्रत्येकाने, प्रत्येक इयत्तेतल्या त्या आठवड्यात काय शिकवणार ते लिहायचे असते. याचा हेतू असा की सगळ्यांनी एकाच विषयावर काम करायचे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाची सम्यक ओळख होते. उदाहरणार्थ इंग्रजी भाषेतील वर्गात जर मानवी भावभावनांवर काम चालू असेल तर इतर विषयांचे शिक्षकही मग त्या विषयावर आधारित कविता, साहित्य इत्यादी काम करतात. चित्रकलेच्या वर्गात त्यावरच चित्रे काढली जातात, नृत्य वर्गात तशीच नृत्ये तर हस्तकला आणि शिल्पकलेच्या वर्गातही भावनांवर आधारित शिल्पे तयार केली जातात.नाटक करताना सहसा शिक्षक हे विद्यार्थ्याला ताठ उभे राहून, अत्यंत मोठ्या आवाजात, स्पष्ट, स्वच्छ बोलायचा आग्रह करतात. विद्यार्थी तसे करू शकत नसल्यास ते त्यांच्या अंगावर ओरडतात. मला हा हेतू आणि पद्धत दोन्ही चूकच वाटतात. नाटकात बोललेले संवाद हे शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जावेत हे कितीही खरे असले तरी ते अशा अनैसर्गिक पद्धतीने ताठ उभे राहून जोरजोरात केकाटायची काहीच आवश्यकता नसते. नाटक हे जीवनाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे मानवाच्या नैसर्गिक देहबोलीला मारक असे शिस्तबद्ध हातवारे आणि हालचाली करायला सांगणे हे तर वेडेपणाचेच आहे. पुन्हा कुठल्याही व्यक्तीवर ओरडल्यावर तो अधिकच कोषात जातो, त्यामुळे रुसून मग पुन्हा विद्यार्थ्याने अधिक मोकळे होऊन बोलावे अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. मग विद्यार्थ्यांना ‘अभिनय’ कसा शिकवावा?‘एरवी तर खूप जोरात ओरडत असतो रे! आता काय झाले,’ असा प्रश्न शिक्षक नेहमी करतात, आणि त्यातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. म्हणजे तणावविरहित आणि विमुक्त अवस्थेत मुले एरवी असतात. त्याच अवस्थेत ते रंगमंचावरही राहिले तर ते जादू निर्माण करू शकतात. किंबहुना मोठ्या गटाबरोबर काम करताना आधी त्यांच्यातून मोठेपणामुळे चढलेली पुटे काढून त्यांना बाल्यावस्थेत नेण्याचे काम मी आधी करतो. मुलांचे निर्लेप, निरागस अस्तित्व हे कुठल्याही सर्जनात्मक ऊर्जेचे भांडार असते, त्याची जाणीव फक्त आपण त्यांना करून द्यायची असते.यासाठी मग मी ते ज्या जागी विमुक्त असतात (उदाहरणार्थ खेळाचे मैदान) त्या जागा आणि ते रंगमंच यातील रेषा पुसट करायला सुरुवात केली. तसेच परिचित जागा (म्हणजे वर्ग वगैरे) यांचा मी रंगमंच करून टाकला. म्हणजे वर्गात आल्यावर शिक्षकांना उभे राहून ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्याचा प्रघात आहे. मी त्यांना तो चित्रविचित्र हावभाव करून म्हणायला सांगू लागलो. वेडेवाकडे चेहरे करून, कधी रागात, कधी हसत, कधी रडत आणि कधी अगदी सावकाश पुटपुटत मुले मला ‘गुड मॉर्निंग, मि. जोशी’ असे म्हणू लागली. त्यांना हे फारच आवडले. त्यांना या कृतीची मजा येत असल्यामुळे त्यांचे आवाज खणखणीत आणि एकसुरात येऊ लागले. आमचा नाटकाचा वर्गच अशा प्रकारे सुरू होत असल्यामुळे पुढील वर्गातही त्यांना उत्साह वाटत असे. तसेच वर्गातून आमच्या नाटकाच्या हॉलपर्यंत जाताना मी कधीच रांगेत उभे राहा. शांतपणे चाला अशा सूचना दिल्या नाहीत. मी फक्त त्यांना विविध कल्पना द्यायचो म्हणजे वर्गातून बाहेर पडल्यानंतर आपण सगळे परग्रहवासी (एलियन्स) आहोत, त्यामुळे या पृथ्वीवरील इतर सजीवांच्या दृष्टीस (म्हणजे इतर अभ्यास करणारे वर्ग) आपण पडता कामा नये वगैरे सांगायचो. लगेच वर्गातील ३०-४० मुले वेडेवाकडे हातपाय आणि चेहरे करून रांगेत उभे राहायची आणि तसेच विनोदी पद्धतीने चालत पण चिडीचूपपणे नाटकाच्या हॉलपर्यंत जायची. कित्येकदा तर पूर्ण वर्ग चालू असेपर्यंत ती एलियन्ससारखीच वागायची. अगदी ‘शू’ला जाऊ का? वगैरेही ती तसेच हावभाव करून, विचित्र आवाजात विचारायची. मीही त्यांना तशाच प्रकारे उत्तर द्यायचो.मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते, त्याला फक्त तुम्ही चालना द्यायला हवी. त्यांच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी करताना त्याला कल्पनाशक्तीची जोड द्यायला मी उद्युक्त केले. म्हणजे मी अनेकदा मधल्या सुट्टीत एखाद्या वर्गात जात असे आणि सगळ्यांना आपण माकडे आहोत असे सांगत असे. मग आम्ही सगळे माकडासारखे डबा खात असू. यात मुलांची नावडती भाजी असली तर मी त्या मुलाला ती भाजी म्हणजे ‘चॉॅकलेट’ असल्यासारखे खाऊन दाखव असे सांगत असे. असे आमच्या वर्गात सगळी मजाच असल्याने मुले तसे करतही. मुले खात नाहीत वगैरे प्रश्न आम्ही असे संपविले. नाटक हे जीवन अधिक मनोरंजक बनवण्यासाठी आहे. फक्त नाटक पाहून ते होईल असे नाही, तर आयुष्यात अशी नाटके करूनही जीवन मनोरंजक होऊ शकते, हे सूत्र मुलांना देण्याचा प्रयत्न केला.माझ्या पाच-सहाशे विद्यार्थ्यांपैकी फारतर पाच विद्यार्थी पुढे जाऊन नाटक करतील याची जाणीव होती; पण त्यांना संवेदनशील प्रेक्षक बनविण्याचा प्रयत्न मी केला. कुठलेही सादरीकरण पाहताना आपले मोबाइल बंद ठेवण्याविषयी आम्ही बोललो. त्यावर मुलांनी आपल्या पालकांसहित अनेकांचे विनोदी किस्से सांगितले. मग आम्ही त्या विनोदी किश्शांवर आधारित एक नाटिकाच केली. एक दिवस तर मुलांना मी ‘मोबाइल’ व्हायला सांगितले. त्यामुळे वर्गात प्रश्न विचारायला हात वर न करता व्हायब्रेट होत अथवा तोंडाने रिंगटोन वाजवत.. मग पुढचे संभाषणही आम्ही फोनवर बोलल्यासारखे करत असू. या असल्या अनेक सरावातून माझी बहुतांश मुले खुलली. जो वेडेपणा आपण आयुष्यात करतो, तोच रंगमंचावर केल्यावर आपल्याला कितीतरी प्रशंसा मिळते याची जाणीव त्यांना झाली. प्रामुख्याने मी अभ्यासात कच्च्या असलेल्या द्वाड मुलांना जाणीवपूर्वक प्राधान्य दिले. त्यांच्यातल्या प्रचंड ऊर्जेला या नाटकामध्ये खूप वाव मिळाला. अशी मुले सतत ओरडा खाऊन प्रचंड न्यूनगंडात असतात. पण आपण करत असलेल्या माकडचेष्टा रंगमंचावर आपल्याला भाव मिळवून देतात याची जाणीव झाल्यामुळे त्यांचा आत्मसन्मान खूप वाढला. त्यांच्या पालकांनी त्यांच्यातले सकारात्मक बदल मला सांगितले. तेव्हा अनेक शिक्षकांनी माझी पाठ थोपटली आणि मी भरून पावलो. तरीही काही मुले बुजत होतीच. अशा मुलांबरोबर मी अत्यंत धीराने वागलो. सतत त्यांना जादू करून दाखवायचो, विनोद, नकला केल्या. मला खातरी होती, एकांतात ही मुले हे नक्की करत असणार. माझा अंदाज खरा ठरला. एकांतात अनेकदा या गोष्टी करून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आपणहून येऊन सादरीकरणात भाग घ्यायला सुरुवात केली. सांगण्यासारखे अजून खूप काही आहे, पण जागेचा अभाव आहे. एवढेच सांगतो की, मी जेवढे त्या मुलांना दिले त्या दुप्पट प्रेम त्यांनी मला आणि नाटकाला दिले. त्यांच्या गोड आवाजातील ‘मिस्टर जोशी’ ही हाक मला आठवली की मला भरून येते.नाटक हे जितके जीवनाच्या जवळ जाईल तितके ते प्रगल्भ होईल; आणि जीवन हे नाटकाच्या जितके जवळ जाईल तितके ते सुंदर होईल. फक्त शिक्षणच नाही, तर ‘कलाशिक्षण’ हाही प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.