डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
अमेरिका आणि इस्रायलसमोर गुडघे टेकायचे नाहीत, हा इराणचा इरादा अतिशय स्पष्ट आहे. मध्यपूर्वेतील ज्या देशात अमेरिकी सैन्यतळ आहेत, तेथे हल्ले करत राहायचे हेही त्यांनी ठरवलेले आहे. परंतु, दुबईत कुठलाही अमेरिकी सैन्यतळ नसताना इराण शांतिप्रिय दुबईवर हल्ले का करत आहे? - अलीकडे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. दुबई हे केवळ एक शहर नाही. आधुनिक काळातील या कुबेरनगरीत ऐश्वर्य ठासून भरलेले आहे.
दुबईत जगातील सुमारे २०० देशांतील लोक राहतात. गतवर्षी सुमारे दोन कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी दुबईची यात्रा केली. दुबईत एकदा तरी गेले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. एक पाकिस्तानी चित्रपट आठवतो : ‘चलो दुबई’. चित्रपटाचे पाकिस्तानी दिग्दर्शक रियाज बटालवी यांनी १९७९ मध्ये हा चित्रपट निर्माण केला. त्यावेळी दुबईला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळून केवळ सात-आठ वर्षे झाली होती.
बटालवी यांना दुबईचे नशीब यशाच्या शिखरावर पोहोचेल याचा अंदाज होता की काय कोण जाणे! कारण आज दुबईत लक्षावधी भारतीय आणि पाकिस्तानी राहतात. तसे आत्ताच्या घडीला दुबईने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे जवळजवळ बंद केले आहे.
प्रश्न असा आहे की, साधारणत: पन्नासेक वर्षांपूर्वी कबिल्यांमध्ये आपापसांत लढणारा, मासे पकडणारा, समुद्रातून मोती काढणारा आणि किरकोळ व्यापार करणारा समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश, अशी दुबईची ओळख होती. मधल्या काळात दुबईने आश्चर्यकारक प्रगती केली.
इराण करत असलेल्या हल्ल्यांच्या मागे दुबईने गाठलेले हे यशाचे शिखरच आहे. म्हणून, आधी दुबईचे यश समजून घेणे गरजेचे आहे. संयुक्त अरब अमिरातीचा विषय निघाला की, सर्वात आधी दुबई समोर उभी राहते. प्रत्यक्षात संयुक्त अरब अमिरात हा सात अमिराती म्हणजे संस्थानांचा समूह आहे. यात दुबईखेरीज अबुधाबी, शारजाह, उम्मुल क़्वेन, अल् फुजेरा, अजमान, रास-अल-खेमा यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी असून, या सर्व संस्थानांना १ डिसेंबर १९७१ रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. पुढच्याच दिवशी रास-अल-खेमा वगळता बाकी सर्वांनी एक संघ निर्माण केला. जवळपास दोन महिन्यांनी इराणने हुर्मुज जलमार्गावरील काही हिश्श्यावर कब्जा केला. त्यानंतर इराणशी युद्धस्थिती उद्भवलीच, तर आपण कमजोर पडू नये, म्हणून रास-अल-खेमाही अमिरातीत सामील झाला. अशा प्रकारे इराणबरोबरचा वाद अमिरातीशी जोडला गेला, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव उभा राहिला.
आज दुबई ज्या यशाच्या शिखरावर पोहचण्यामागे आहे तेथील शासक शेख मोहम्मद यांची दूरदृष्टी! दुबईचे सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपीमध्ये तेलाचा वाटा केवळ एक टक्का आहे, परंतु त्यांनी परिस्थिती अशी तयार केली की, देश वैभवाच्या दिशेने वेगाने पुढे जात राहील. त्यांची भूमिका रोखठोक आहे - ‘या, येथे काम करा, व्यापार करा, खा-प्या, मौज करा, पण मूर्खपणा, गडबड केलीत, तर चालणार नाही!’
दुबईत पूर्णपणे कायद्याचे राज्य आहे. देश करमुक्त आहे. व्यापार अत्यंत सुकर आहे. याच कारणाने दुबई या घटकेला जगातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र झाले आहे. अलंकारिक भाषेत सांगायचे तर जगभरातून जहाज भरून भरून सोने येथे येते, आलेले धन येथे ठेवले जाते; इतकेच नव्हे तर दुसऱ्या देशांच्या माध्यमातून इस्रायल आणि चीनचीही येथे गुंतवणूक आहे. एकेकाळी बेल्जियम आणि इस्त्रायलमध्ये हिऱ्यांचा व्यापार बहरलेला होता, परंतु आता दुबई त्याचे केंद्र आहे.
संयुक्त अरब अमिरात, विशेषतः दुबईमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे. इतकेच काय, क्रिकेटही त्यांनी देशात प्रचलित केले आहे. दुबईत आश्चर्यचकित करणारी बांधकामे उभी करत शानदार जीवनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. एकेकाळी युरोप हे करत होता. दुबईतील बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मरीना, जुमेरा लेक टॉवर्स, जुमेरा हाइट्स यांसारख्या आधुनिक इमारती पाहणाऱ्याला तोंडात बोट घालायला लावतात. पाम जुमेरा हे मानवनिर्मित बेट असून, याच्या निर्मितीसाठी काँक्रीट तसेच लोखंडाचा उपयोग केला गेलेला नाही, ही कमालीची गोष्ट होय.
समुद्रातून १२० दशलक्ष क्युबिक मीटर वाळू बाहेर काढून पाम जुमेरा बेट निर्माण केले गेले. दुबई मेट्रो हा एक अद्वितीय प्रकल्प आहे. दुबईने जे मनात आणले ते साकार केले. जगभरातील उत्तम काम करणाऱ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी गरजेचे आहे ते सगळे दुबईत केले जाते. परदेशातील लोकांना तर येथे खूपच सवलती मिळतात. लग्न न झालेली विदेशी जोडपी येथे एकत्र राहू शकतात. त्यांना मुले झाली, तरी ती स्वीकारली जातात. दूरवरचा विचार हे संयुक्त अरब अमिरातीचे वैशिष्ट्य आहे. त्याने सर्व देशांशी मैत्रीचे संबंध राखले. एकीकडे आलिशान मशिदी उभारल्या, तर दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेच्या भावनेचा आदर करीत अबुधाबीत हिंदू मंदिर बांधायलाही परवानगी दिली.
पण मग अमिरात आणि विशेषत: दुबईवर इराण हल्ले का करत आहे? आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इराणने डागले. बरेचसे नष्ट केले गेले; परंतु पुष्कळ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन दुबईवर पडले. दुबई विमानतळावर स्फोट झाले. लोकांचे बळीही गेले. दुबईचे डोळ्यात भरणारे आर्थिक यश उद्ध्वस्त करणे, दुबईवरच्या जगाच्या विश्वासाला ढळ लावणे हा त्यामागचा इरादा.
इराणला यात यश मिळेल काय? परिणाम काहीही असो, पण इराणचा इरादा बुलंद आहे की, तुम्ही अमेरिकेबरोबर असाल, तर तुम्हाला सोडणार नाही! ज्या लोकांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे, त्यांचे जीवन किती चिंताग्रस्त असेल? पण सामान्य माणसाचा विचार करतो कोण? सांड जेव्हा एकमेकांशी लढतात, तेव्हा शेत पायदळी तुडवले जातेच.
आज संयुक्त राष्ट्र आणि शांततेचा राग आळवणाऱ्या सर्व संस्था निरर्थक झाल्या आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ ही म्हण सत्य ठरत आहे. अमेरिका स्वतःला जगाचा नेता म्हणवतो तर त्याने नेत्याप्रमाणे वर्तनही करायला हवे.
Web Summary : Iran's attacks on Dubai stem from its economic success and ties to the West. Despite lacking US military presence, Dubai's prosperity and global connections make it a target, aiming to destabilize its economy and international standing amid regional tensions.
Web Summary : ईरान के दुबई पर हमले उसकी आर्थिक सफलता और पश्चिम से संबंधों के कारण हैं। अमेरिकी सैन्य उपस्थिति के अभाव के बावजूद, दुबई की समृद्धि और वैश्विक संबंध इसे निशाना बनाते हैं, जिसका उद्देश्य क्षेत्रीय तनाव के बीच इसकी अर्थव्यवस्था और अंतर्राष्ट्रीय स्थिति को अस्थिर करना है।