शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

By सुधीर लंके | Updated: August 29, 2023 09:11 IST

आज अनेक क्षेत्रात ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. त्यांची सरंजामी मानसिकता हा खरा प्रश्न आहे, ती कशी बदलणार? 

- सुधीर लंके (निवासी संपादक, अहमदनगर आवृत्ती)

‘शोले’ हा सिनेमा १९७५ साली स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. त्याला दोन वर्षांनी अर्धशतक पूर्ण होईल. शोलेमधील ‘गब्बर’ला आपण आजवर विसरू शकलेलो नाही. हा गब्बर ना-ना धंदे करतो, गाव लुटतो. महिलांना पळवितो. दहशत माजवतो. बसंतीला बळजबरी नाचायला लावतो.  गब्बर हा केवळ डाकू नव्हता, ती एक मानसिकता आहे. लोकांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याची. परवा अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे कबुतर व शेळ्या चोरल्याच्या संशयावरून एका इसमाने चार तरुणांना झाडावर उलटे टांगून जी मारहाण केली ती देखील ‘गब्बरसिंगी’ मानसिकताच आहे.

ग्रामीण भाषेत याला ‘सरंजामी’ मानसिकता म्हणता येईल. श्रीरामपूरच्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. थेट गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. खरंच कारवाई होणार का? हे न्यायालयीन निकालानंतर समजेल. पण, मूळ मुद्दा हा की, तरुणांना उलटे टांगून त्यांना मारहाण करण्याइतके धाडस छोट्या हरेगावमधील नानासाहेब गलांडे नावाच्या एका व्यक्तीत आले कसे? हा गलांडे एका रात्रीत घडलेला नाही. ही ‘गब्बर’ प्रशासनाची देण असल्याचे गावात चर्चा केल्यानंतर जाणवते. तो अनेकांना धमकावत होता. त्याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. जुने जमीनदार शेतावरील मजुरांना व गावातील इतर लोकांना गुलाम समजायचे. तशाच मानसिकतेत हा गलांडे वावरत होता. 

गलांडे दोषी आहेच. पण या प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूचीही चर्चा व्हायला हवी. ती बाजूही तितकीच गंभीर आहे. गलांडेने चार तरुणांना मारहाण केली. त्यात दोन मागासवर्गीय तरुण आहेत व दोन इतर समाजातील. गलांडे याच्यासोबत मारहाण करणारे एकूण सात आरोपी आहेत. त्यातील तीन आरोपी मराठा समाजातील तर चार मागासवर्गीय समाजातील आहेत. म्हणजे गलांडे याच्या आदेशावरून मागासवर्गीय मुलेच मागासवर्गीय मुलांना मारत होती. तसेच मराठा मुलेच मराठा मुलांना मारत होती. याचा अर्थ असा मुळीच नव्हे की स्वजातीत नव्हे तर परजातीत भांडणे व हाणामारी करा.

गुन्हेगारांना जात नसते. हे जातनिहाय उदाहरण एवढ्यासाठी नमूद केले आहे की, जो सत्ताधीश अथवा मालक आहे त्याच्या आदेशावरून त्याच्या हाताखालील ‘गुलाम’ मानसिकतेचे लोक वागतात. येथे गलांडे हा मालक आहे. तो सरंजामी वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याच्या मानसिकतेनुसार त्याची टोळी वागली. येथे जातीपेक्षाही मानसिकतेचा मुद्दा गंभीर आहे. आपण या मालकाचे चुकीचे आदेश पाळू नयेत असे या गुलामांना वाटले नाही. लोकशाहीत ही गुलामी सर्वात भयानक आहे. ही गुलामीच सरंजामदारांना जन्म देते. जेवढ्या काही गुंडपुंडांच्या व दादा लोकांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांत असेच ‘सरंजामदार’ व हाताखाली राबणारे ‘गुलाम’ आहेत.

त्यामुळे हरेगावच्या घटनेची चर्चा करताना सरंजामी मानसिकतेपासून गुलामांना मुक्त कसे करणार? ही चर्चा व्हायला हवी. सरंजामांच्या हाताखाली गुलामच राहिले नाहीत तर हे लोक रुबाब कुणाच्या जोरावर गाजवतील? अशी सरंजामी व गुलामी अगदी गावखेड्यापासून दिल्लीचे राजकारण, प्रशासन अशी सगळीकडे आहे. (भलेही राजकारणी व प्रशासन लोकांना थेट उलटे टांगत नसतील.) गलांडे हा गावात दहशत माजवत असताना गाव मौन बाळगून असेल तर या मानसिकतेला काय म्हणणार? नगर जिल्ह्यातीलच खर्डा गावात मुलीवर प्रेम केले या संशयावरून नितीन आगे या मागासवर्गीय मुलाला शाळेतून उचलून नेले. पुढे त्याची हत्या केली. याप्रकरणात एकही शिक्षक अथवा गावकरी साक्ष देताना टिकला नाही. सगळ्या गावाने डोळे बंद करून घेतले. साक्षीदार फितूर झाले. त्यांचे गाव, जिल्हा, राज्य, प्रशासन यांनाही काहीच वाटले नाही. आरोपी निर्दोष आहेत तर नितीन आगेचा खून कुणी केला? याचे उत्तर न्यायपालिकेकडूनही मिळालेले नाही. 

‘गब्बरसिंग’ कायदा हातात घेत होता आणि कायदा हातात घेतल्याने आपले काहीच बिघडत नाही असे त्याला वाटते म्हणूनच तो दादागिरी करत राहिला. असे गब्बर आता गावोगाव आहेत. कुठे ते सावकार आहेत. काही गावांत ते वाळूतस्कर आहेत. काही गावांत ते भूखंडमाफिया आहेत. अन्य सभ्य म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रातही ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. बंदुकीच्या गोळ्यांची माळ गळ्यात लटकवलेला व काळ्या दातवालाच माणूस गब्बर असतो असे नव्हे. तो अगदी पांढऱ्या कपड्यांतही असू शकतो. शाळेत मुलांना अमानुष मारहाण करणारे, महिलांची विवस्त्र धिंड काढणारे, प्रेम केले म्हणून मुला-मुलींना संपविण्याची भाषा करणारे सगळे ‘गब्बरसिंगी’ मानसिकतेचेच आहेत. त्यांना वठणीवर आणणारे जय-विरू आज कुठे आहेत?  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी