डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे खरेच भारताचे मित्र होते का? अर्थात आजही ते भारताला आपला मित्रच म्हणतात. त्यांना भारताचा इतका राग का यावा की त्यांनी आपल्यावर करांचा मोठा बोजा लादला आणि पाकिस्तानला आपल्या मांडीवर घेऊन बसले. जणूकाही त्यांना भारताशी कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते! या प्रश्नाचे उत्तर आपण शोधले पाहिजे.
मी अमेरिकेसमोर झुकण्याबद्दल बोलत नाहीये, पण सध्या आपली कुटनीती हे एक मोठे आव्हान आहे. ट्रम्प यांना खरोखर काय हवे आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. पाकिस्तानबरोबरचे युद्ध त्यांनी थांबवले हे भारतीयांना ठाऊकच नव्हते! ते त्यांनीच सांगितले. भारताने त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिले नाही तरीही त्यांना काहीच फरक पडला नाही.
आता हेच पाहा ना, आपल्याकडे पेट्रोलियम पदार्थांचे प्रचंड साठे आहेत हे बिचाऱ्या पाकिस्तान्यांना ठाऊकच नव्हते. ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील खात्यावर ही माहिती दिल्यावर त्यांना हे कळले की, आपल्याकडचे तेल एक दिवस आपण भारतालाही विकू शकतो! प्रत्यक्षात पाकिस्तानी लोक पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईशी लढत आहेत. तेल उत्पादनात ११ टक्क्यांची घट झाली आहे. अशा अवस्थेतल्या देशाला ‘तुम्ही अरब देशांसारखे तेल विकू लागाल’ असे मुंगेरीलालचे स्वप्न कोणी दाखवले तर काय परिस्थिती होईल? त्या देशाला वेड लागल्यासारखे होईल की नाही?
आता जे थोडे फार लिहितात, वाचतात किंवा ज्यांना पेट्रोलियमच्या साठ्याविषयी कोठे काय शोधकार्य चालले आहे याची माहिती आहे, त्यांना वास्तवाची जाणीव आहे. भारताकडे कच्च्या तेलाचे साठे ५६०० लाख बॅरलच्या आसपास आहेत. त्याचवेळी पाकिस्तानकडे केवळ २३६ लाख बॅरलच्या आसपास तेलसाठे असावेत, असा अंदाज आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतात प्रतिदिन सहा लाख बॅरल तेल उत्पादन झाले, पाकिस्तानचा हा आकडा केवळ ६८ हजार बॅरल इतकाच आहे. पाकिस्तानकडे तेलाचे खूप मोठे साठे असू शकतात असे वेळोवेळी म्हटले जात आहे, हे खरे. २०१५ साली अमेरिकी ऊर्जा सूचना प्रशासनाने केवळ विश्लेषणाच्या आधारे असे सांगून टाकले होते की, पाकिस्तानमध्ये सुमारे नऊ अब्ज बॅरल तेल साठे असू शकतात. भारताचा आकडा केवळ ३.८ अब्ज बॅरल इतका सांगितला गेला. त्यावेळी सुद्धा अमेरिकेचा इरादा चांगला नाही, अशी शंका घेतली गेली. हे सांगून ट्रम्प भारताला घाबवरण्याचा प्रयत्न करत आहेत, हे नक्की.
पाकिस्तानातील तेल बाहेर काढण्याचे काम अमेरिकन कंपन्या करतील आणि पाकिस्तानला मालामाल करून टाकतील, असे ते सांगतात. अमेरिकेत तंदुरुस्त ठेवण्यासाठी मांसाहार दिल्या जाणाऱ्या गायींचे दूध ते धाकदपटशा दाखवून भारतात विकून दाखवतील, असे ते सांगतात; परंतु एखाद्या देशाला घाबरवण्याचा हा कोणता मार्ग? ट्रम्प यांनी सांगितले आणि आपला विश्वास बसला? आपल्याला बुद्धी नाही? बहुधा ट्रम्प यांना तसे वाटत असावे. परंतु ते भारतीय संस्कृतीला ओळखत नाहीत. आपल्या देशात सरकार कोणाचेही असो, ट्रम्प यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.
मिस्टर ट्रम्प, आपण भारताची अर्थव्यवस्था मृत झाली आहे असे म्हणत आहात, तर जरा आकड्यांचे विश्लेषण करून पाहा. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार मागच्या १० वर्षांत १०५ टक्क्यांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल तुम्ही वाचला असता तर अशा प्रकारची विधाने तुम्ही केली नसती. २०२५-२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.४ टक्के दराने वाढेल, असेही अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहेत. या कालखंडात अमेरिकेची अर्थव्यवस्था केवळ अनुक्रमे १.९ टक्के आणि दोन टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेतील वाढ केवळ तीन टक्के इतकीच राहण्याची शक्यताही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग काय आहे हे आकडेवारीने सिद्ध होतेच. भारत काय आपोआपच जगातील चौथी अर्थव्यवस्था झाला? लवकरच आमचा देश तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. ट्रम्प यांची खरी चिंता अशी आहे की, आधीच चीन आव्हान देत आहे. भविष्यात भारतही आव्हान देऊ लागला, तर सर्वशक्तिमान असलेल्या या देशाला खूपच त्रास होईल म्हणून ते आधीच तंगडी टाकत आहेत. तंगडी टाकणे म्हणजे काय हे माहीत आहे ना? लहानपणीच्या खेळात एखादा बदमाश मुलगा स्पर्धेत धावणाऱ्या मुलाच्या पायात पाय घालून त्याला पाडण्याचा प्रयत्न करीत असे; पण मिस्टर ट्रम्प, आम्ही इतके मरतुकडे नाही!
पण परिस्थिती नाजूकपणे हाताळावी लागेल. आजच्या जागतिक घडामोडी अत्यंत नाजूक टप्प्यावर आहेत. अमेरिका ही जगातील एक शक्ती आहे आणि जर ती उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली तर ते आपल्यासाठी अडचणीचे ठरेल, कारण चीनही पाकिस्तानच्या बाजूने आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे रशिया अजूनही आपल्यासोबत आहे. या मैत्रीला नजर लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची जाणीव ठेवत आपल्याला अधिक जागरूक रहावे लागेल आणि बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. परिस्थिती कठीण आहे, पण भारतही खूप सक्षम आहे. अशा परिस्थितींना कसे तोंड द्यायचे हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच आपण आज प्रगतीच्या मार्गावर आहोत. प्रगतीसाठी मित्र जास्त आणि शत्रू कमी असणे महत्त्वाचे आहे! दोस्तीसाठी संवादाशिवाय दुसरा चांगला मार्ग कोणता असू शकतो?