शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हा विजेचा दुय्यम ग्राहक का ठरतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 04:06 IST

प्रश्न केवळ शेतकरी बिले भरत नाही हा नव्हे , शेतकऱ्यांना वीज ग्राहक म्हणून पूर्णवेळ वीज व सेवा का मिळत नाही हादेखील प्रश्न आहे.

शिवाजी पवार, उपसंपादक, लोकमत, अहमदनगर -ऊर्जा खात्याने सुरू केलेली कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. मात्र हा आदेश खालच्या यंत्रणेपर्यंत झिरपत नाही तोच या खात्याचे मंत्री असलेले नितीन राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांची घोषणा बुधवारी पुसून टाकली. आता राज्यभरात कृषी पंपाच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी तोडणी कार्यक्रम पुनश्च हाती घेतला जाणार आहे. (Why is a farmer a secondary consumer of electricity?)राज्यातील शेतकऱ्यांकडील वीज थकबाकी हा मागील भाजप सेनेच्या युती सरकारपासूनच सतत पेटता राहिलेला विषय आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ऊर्जा खाते आणि त्या खात्याचा मंत्री हा नेहमी चर्चेत राहतो. कारण हे खाते थेट जनतेशी संबंधित जिव्हाळ्याच्या आणि रोजच्या जगण्यामरणाच्या विषयाशी जोडले गेले आहे. कृषी पंपाची थकबाकी आता ४५ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. दरवर्षी त्यात चार ते पाच हजार कोटी रुपयांची भर पडत आहे, मात्र वसुली केवळ ८ टक्क्यांच्या खाली होत आहे. आता तर एकेका शेतकऱ्यांकडील बाकी ४० हजारांपासून दीड लाखांवर थकली आहे. गेल्या दोन चार वर्षात कृषी पंपाची वसुली ठप्प झाल्यात जमा आहे. त्याला अस्मानी संकटे जशी कारणीभूत आहेत, तशीच सुलतानी धोरणेही जबाबदार आहेत. कृषी पंपांचे थकीत वीजबिल हा अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट विषय आहे. विशेषत: भारतीय वीज कायदा २००३ हा वीज तोडणीबद्दल काय सांगतो हे तपासून पहायला हवे.मुळात महावितरण कंपनीने अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज रोहित्रे बंद करणे ही या कायद्यान्वये बेकायदेशीर बाब आहे. कंपनी जर शेतकऱ्यांकडे ग्राहक म्हणून पाहत असेल तर वीज कायद्यातील कलम ५६ (१) नुसार वैयक्तिकरीत्या नोटिसा बजवाव्या लागतात. मात्र अशा नोटिसा देण्यात आल्याचे पाहण्यात नाही. घरगुती ग्राहकांप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी पंपांची बिले नियमित हातात पडत नाहीत. अनेकदा दोन-तीन वर्षातून बिल पाठविले जाते. त्यामुळे वसुलीच्या प्रक्रियेला गांभीर्य प्राप्त होत नाही. ही बाब कंपनी दुरूस्त करायला तयार नाही. बिलांच्या वाटपाचे काम कंपनीने आऊटसोर्स केलेले आहे.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांकरिता वीजबिल सवलत योजना अमलात आणली होती. त्यानुसार आजही बिलातील दोन तृतीयांश रक्कम अनुदान स्वरुपात महावितरण कंपनीला सरकारकडून दिली जाते. त्यामुळे कंपनीच्या तिजोरीत शेतकऱ्यांमुळे खडखडाट झालेला नाही ही बाब येथे ध्यानात घ्यावी लागेल.आलटून पालटून सर्वच पक्ष सत्तेत स्वार झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे गाजर या सर्व मंडळींनी दाखविले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच तशी घोषणा केली. एकूण वीज वापरामध्ये शेती क्षेत्राचा वाटा २० ते २५ टक्के आहे. मात्र सर्वच थकबाकी जणू काही शेतकऱ्यांकडे असल्याचा कांगावा होतो. औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांची विजेची मागणी रात्रीच्या वेळी कमी होते. त्यामुळे उरली सुरली वीज तेव्हा शेतीकडे रवाना केली जाते. शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास विजेचा भार समांतर करण्याचा हा भाग आहे. शेतकऱ्यांना वीज कोणत्या वेळी द्यावयाची हे महावितरण ठरविते. म्हणजे विजेची खात्री नाही. शेतकऱ्याला जसा शेतात घाम गाळावा लागतो, तशीच विजेच्या तारेवरही त्याची कसरत होते. कधी विजेच्या तारा तुटतात, तर कधी रोहित्रांमध्ये बिघाड होतो. ही कामे जवळपास बीओटी तत्वावर सध्या सुरू आहेत. शेतकरी स्वत:च लोकवर्गणी करून दुरूस्तीची कामे करतात. ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पहायला मिळते. कारण महावितरण कंपनीकडे दहा ते पंधरा गावची धुरा एक लाईनमन वाहतो. आपल्याकडे शेतमालाच्या उत्पादन खर्चाचे गणित मांडून किमान आधारभूत दर (कमाल नव्हे) जाहीर केले जातात. त्यात विजेचा खर्च गृहित धरला जात नाही. त्यामुळे शेतमालाची दर निश्चिती सर्वसमावेशक नाही. राज्य सरकारने नवीन कृषी पंप वीज जोडणीचे धोरण आणले आहे. त्यात एक लाख वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा यंत्रणा अद्ययावत करावी लागेल. पाच ते सात हजार कोटी रुपयांचे भागभांडवल त्यासाठी आवश्यक आहे. थकीत वीज बिलांसाठी सवलत योजना त्यासाठी जाहीर करण्यात आली. बिलावरील दंड व व्याज माफी करूनही योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ दोन टक्के वसुली झाली आहे. मागील सरकारमध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही विरोधानंतर तोडणी मोहीम थांबवावी लागली होती. महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले. येथेही उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांमध्ये वीज तोडणीवरून विसंगती दिसून आली. विधानसभेतील स्थगिती विधान परिषदेत उठवली गेली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला हा प्रश्न येणाऱ्या काळातही धुमसत राहील अशीच शक्यता आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीElectionनिवडणूकmahavitaranमहावितरण