शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावावर प्रेमाला पायदळी का चिरडता?

By विजय दर्डा | Updated: May 9, 2022 12:01 IST

सृष्टीचा विनाश होऊ नये, म्हणून शंकराने हलाहल पचवले होते. - आणि आज? - धर्माच्या नावावर जगण्यात विष कालवले जात आहे!

-  विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूहदोन घटनांनी मी विचारात पडलो आहे, चिंतित आहे. पहिली घटना आहे हैदराबादची. नागराजू या हिंदू तरुणाने त्याची खास मैत्रीण सुलतानाशी लग्न केले. मुलीच्या घरच्यांना हे सहन झाले नाही, त्यांनी नागराजूची हत्या केली. दुसरी घटना हजार किलोमीटर दूर गुजरातेत घडली.  एका हिंदू घरात पूजाअर्चना चालली होती. लाऊडस्पीकरचा मोठा आवाज हिंदू शेजाऱ्याला सहन झाला नाही. त्यांनी पूजा करणाऱ्या दोन हिंदूंवर हल्ला केला. पहिल्या घटनेला स्वाभाविकपणे धार्मिक रंग देण्यात आला. अशा प्रकरणात पूर्वीही असेच झाले आहे. हिंदू मुलाचे मुसलमान मुलीशी किंवा किंवा मुसलमान मुलाचे हिंदू मुलीशी लग्न झाले तर दोन्ही समाज हा आपल्या धर्मावर हल्ला मानत आले. त्याचे परिणाम गंभीर होतात; पण या दुसऱ्या घटनेत तर हिंदूने हिंदूवर हल्ला केला. तोही लाउडस्पीकर मोठ्याने लावला म्हणून. 

- दोन्ही घटनांची कारणे पाहिली तर त्यात एक समानता दिसते : ती म्हणजे असहिष्णुता. ज्या देशाचा पाया सहिष्णुता आहे, ज्याने ‘सर्वे सुखिन: भवन्तु’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चे सूत्र रचले, ज्या देशाने आर्यांपासून शक-हूणांपर्यंत सगळे आत्मसात केले, जिथे भगवान राम, बुद्ध, महावीर, महात्मा गांधी आणि विवेकानंदांनी सहिष्णुतेचा संदेश दिला; त्या देशात इतकी असहिष्णुता कुठून आली, हा एकच प्रश्न मला सतावतो आहे.

सृष्टी वाचविण्यासाठी भगवान शंकराने विष प्राशन केले; याला पौराणिक मान्यता देणाऱ्या देशात लोक एकमेकांबद्दल इतके निर्दयी कसे झाले? आपण गीता, कुराण, गुरु ग्रंथसाहिब किंवा बायबल असा कोणताही धर्मग्रंथ पाहा, असहिष्णुतेचा संस्कार यातले कोणीच देत नाही,  मग गोष्टी इतक्या गंभीर अवस्थेपर्यंत कशा पोहोचल्या?- मला वाटते, धर्माच्या नावावर पोळी भाजून घेणाऱ्यांनी असे काही गंभीर कुचक्र रचले आहे की आपल्या संस्कृतीचीच दुर्दैवी शिकार होऊन गेली. जीवनापेक्षा धर्म मोठा झाला. धर्माच्या नावावर एखाद्या माणसाचा जीव घेणे ही अगदी सामान्य गोष्ट झाली. सामाजिक विषमता नष्ट करायची आणि वाईट प्रथा हटवून समरसता आणायची असेल तर प्रेमविवाहांना प्रोत्साहन द्यावे लागेल,  असे बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रेम हे प्रकृतिमान्य तत्त्व आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्याला घडवणाऱ्यानेच तशी रचना केली आहे. प्रेमाचे द्रव्य जन्मत:च आपल्या शरीरात टोचले आहे. एकमेकांना पसंत करणाऱ्या, एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या दोघांनी लग्न केले तर त्यांना थेट ठार मारून टाकले जाते? - हा किती मोठा अधर्म आहे? प्रेम करणे हा काय गुन्हा आहे का? धर्माच्या नावावर परस्परांमध्ये आग लावून आपला स्वार्थ साधून घेणाऱ्यांनो, दोन प्रेमीजिवांना थेट संपवूनच टाकण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?मी वेगवेगळ्या निमित्तांनी, वेळोवेळी विविध धर्मांच्या तरुण मुला-मुलींना भेटत, त्यांच्याशी बोलत असतो. खरेतर त्यांच्या  जगण्यात, विचारांत या अशा माणुसकीशून्य  गोष्टींना स्वाभाविक थारा नसतो, पण धर्माच्या नावे त्यांना भडकवले जाते.

‘जिस भगवानने ये जहान बनाया, उसके छोटेसे गोले का तुम छोटासा आदमी भगवान की रक्षा करेगा?’- खरेतर भगवंतानेच हे अवघे विश्व तयार केले. त्या  अखिल विश्वातल्या एका छोट्याशा पृथ्वीवरचा इवलासा माणूस खुद्द भगवंताचे रक्षण करण्याएवढा मोठा कधीपासून झाला? - असा प्रश्न पीके चित्रपटात आमीर खानचा नायक विचारतो. आपल्या भगवंताचे हे असे रक्षण वगेैरे करण्याची उद्धट नाटके बंद करा, नाहीतर या पृथ्वीवर माणूस नव्हे फक्त जोडा राहील, असेही तो पुढे सांगतो.मुख्य म्हणजे लाउडस्पीकर हा काय परस्परांच्या उरावर बसण्याइतके भांडण भडकवण्याचा विषय आहे का? गरिबी नष्ट करणे, सर्वांना भाकरी, कपडे आणि घर देणे, सर्वांना आरोग्य सेवा पुरवणे, रोजगार देणे हे खरे विषय आहेत, असले पाहिजेत. कर्कश किंचाळ्यांनी लोकांना त्रास देणे लाउडस्पीकरचे काम नाही. गरीब, शोषित आणि वंचितांचा आवाज बुलंद करणे, हे काम लाउडस्पीकरने केले पाहिजे.  लाउडस्पीकरला धर्माचे रंग कशाला देता? माझ्या लाउडस्पीकरपेक्षा तुझ्या लाउडस्पीकरचा आवाज जास्त कसा? - यावरून भांडण आहे. असले बकवास विषय बंद केले नाहीत, तर देश भलत्याच रस्त्यावर जाईल, हे कोणालाच कसे जाणवत नाही? 

हा सगळा कल्ला सुरू झाल्यापासून मला माझे बालपण आठवते आहे. अजान व्हायची तेव्हा गावातले लोक उठून कामाला लागायचे. ही अजान कशासाठी असते हेच कोणाच्या गावी नव्हते. एखाद्या गावात दहा, दुसऱ्यात वीस, तर तिसऱ्यात फार तर शंभरेक घरे मुसलमानांची असायची. ईद आणि दिवाळीला सारा गाव आनंदात न्हाऊन निघायचा.  सर्व धर्मांचे लोक सर्व सण साजरे करत; पण आता वातावरण इतके बिघडवले गेले आहे की, धर्माच्या नावावर बघता-बघता रक्त वाहू लागते.

देशासमोर धार्मिक उन्मादाची खोल दरी आहे. अशा उन्मादावर पंतप्रधान मोदी काहीच कसे बोलत नाहीत, असे विचारणाऱ्यांना मी विचारतो, पंतप्रधानांना दुसरे काम  नाही काय? त्यांनी धर्मरक्षण करावे की, देशाला विकासाच्या रस्त्याने न्यावे? कोणती संघटना, कोणता उत्पात माजवण्याची तयारी करत आहे, हे त्यांना कसे माहीत असणार? कोणता कुटुंबप्रमुख आपलेच घर उद्ध्वस्त करील? मोदींच्या काळात तर मुस्लीम देशांशी आपले संबंध सुधारले आहेत. अनेक मुस्लीम देशांत मंदिरे उभी राहिली आहेत.धर्माच्या बाबतीत सध्याचा उतावळेपणाचा विषय आला की मी विचारतो, एखाद्या धर्माच्या लोकांना आपण या देशापासून वंचित करू शकतो का? - अजिबात नाही. मग एकमेकांविषयी प्रेम, सन्मान राखून आपण सगळेच एकत्र का राहू  शकत नाही? एखाद्या समुदायाला लक्ष्य केले गेले, तर त्यातले शास्त्रज्ञ वकील, उद्योगपती, विद्यार्थी आणि बुद्धिवान लोकांवर काय परिणाम होईल, याचा जरा विचार करा. दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्यांसाठी एखाद्या समुदायाला जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. जो मोठा असतो, त्याची जबाबदारी मोठी असते; हे विसरता कामा नये.धर्माच्या नावाने लढण्यात जी शक्ती, ऊर्जा तुम्ही खर्च करता आहात, ती दुष्ट प्रथा नष्ट करण्याच्या कामी लावा, हे उत्तम! हा देश आजही अंधश्रद्धा बाळगून आहे. इथे कोवळ्या मुलांचे नरबळी दिले जातात, जादूटोणा करते म्हणून महिलेला चेटकीण ठरवले जाते... हे सगळे आजही चालू आहे... करायचेच असेल, तर या सगळ्याचे काहीतरी करा ना!