शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

संतप्त जमाव कायदा का हातात घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 07:48 IST

अण्णा वैद्य या गुन्हेगाराला जमावाने नुकतेच ठार केले. वीस वर्षांपूर्वीची अक्कू यादवची घटना तर आजही लोक विसरलेले नाहीत. वारंवार का होते असे?

रवींद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार

सोळा वर्षापूर्वी चार महिलांची हत्या करुन त्यांचे मृतदेह आपल्या शेतात पुरल्याचा आरोप असणाऱ्या अण्णा वैद्य याचा संतप्त गावकऱ्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील सुगाव येथील या घटनेने राज्यभरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे उ‌द्भवलेल्या सामाजिक अस्वस्थतेकडे लक्ष वेधले आहे.

संतप्त नागरिकांच्या जमावाने थेट कायदाच हातात घेत गुन्हेगाराला ठार करण्याची राज्यातील ही पहिली घटना नाही. कधी कुठला मनुष्य चोर असल्याचा संशय जमावाला येतो आणि त्याला अमानुष मारहाण होते. त्यात त्याचा मृत्यू ओढवतो. कुठे मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या समजातून मारहाण होते. आयुष्यभर कायद्याची भीडभाड बाळगणारा सर्वसामान्य नागरिक जेव्हा कायदा बाजूला ठेवत हत्येसारखा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो, तेव्हा समाजासमोर अनेक प्रश्न उभे ठाकतात. त्यांची उत्तरे शोथेपर्यंत दुसन्या भागात तशीच आणखी घटना घडते. ही उत्तरे शोधण्याच्या उदासीनतेपोटीच अशा घटनांची पुनरावृत्ती होत असते.

वीस वर्षांपूर्वी नागपुरात दोनशे महिलांनी एकत्र येत न्यायालयाच्या आवारातच भारत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव या गुंडाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या घटनेची दखल घेतली गेली. अक्कू यादवने दहशतीच्या जोरावर असंख्य महिलांवर केलेल्या अत्याचारांच्या सत्य कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्या घटनेच्या चौकशी अहवालात त्या सविस्तर नमूद आहेत. अक्कू यादव महिलांवर अत्याचार करत होता, तेव्हा पोलिस निष्क्रिय राहिले होते आणि महिलांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा तर पोलिसांनी ड्यूटी सोडून पळ काढल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दोन दशके उलटून गेल्यानंतरही राज्यात बहुतेक ठिकाणी अशी स्थिती आणि त्याचे दुष्परिणाम कायम असल्याचे दिसून येते. गुंड रस्त्यात मुडदे पाडेपर्यंत तपास यंत्रणा स्तब्ध राहत असल्यानेही नागरिक कायदा हातात घेतात, हे कायदा आणि सुव्यवस्थेत अराजक माजण्याचे द्योतक आहे. पुणे-नाशिक परिसरात अधूनमधून कोयता गंगची दहशत नागरिकांना भयभीत करून सोडते. दुकाने, वाहनांवर कोयत्याने हल्ले करून या टोळ्या त्याचे व्हिडीओ काढत ते स्वतःच व्हायरल करतात आणि आपली खंडणी वाढवतात. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करण्यामागेही हीच मानसिकता असते. 

एखाद्दुसऱ्या गुंडाची धिंड काढून ही गुंडगिरी थांबत नसते, याचाही अनुभव नागरिक घेत आहेत. अहमदनगरमधील अण्णा वैद्य याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली होती. तेरा वर्षे तुरुंगात राहून बाहेर पडल्यावर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे अनेक गुन्हेगार तुरुंगवारीनंतर गुन्हेगारीत आणखीच तरबेज झालेले दिसतात. याचाच अर्थ शिक्षापात्र अथवा शिक्षाधीन कैद्यांचे परिवर्तन आणि सुधारणा करण्यात व्यवस्था अपयशीच ठरलेली असते.

 गुन्हेशास्त्राचा आधार घेत कैद्यांमध्ये सुधारणा करण्याचे कोणतेही प्रयत्न तुरुंगात होत नाहीत. आरोपींची मानसिक प्रकृती अथवा विकृती, त्यामुळे उ‌द्भवलेल्या समस्या, आरोपी व समाज यांचे परस्परसंबंध या आणि यासारख्या सर्व बाबींचा विचार गुन्हेशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे आरोपीचे मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व व नीतिमत्ता या सर्वांचा अभ्यास केला जातो. गुन्हा का, कसा व कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला, गुन्हा करण्यामागील हेतू कोणता होता, त्यामुळे एकूण समाजावर कोणते विपरीत परिणाम झाले, इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह गुन्हेशास्त्रात केला जातो. गुन्हेगारीमुळे सामाजिक जीवनात अस्थिरता व असुरक्षितता येते. जेथे शासनामध्ये शिथिलता आणि भौगळपणा येतो, तेथे गुन्ह्याची दखल वेळीच व कार्यक्षमतेने घेतली जात नाही. गुन्हेगारांना जेथे सुरक्षितता वाटते, तेथे सामान्यांना भय वाटू लागते.

गुन्हा करणाऱ्याच्या हातून समाजावर अन्याय झालेला असतो. अन्यायाचे परिमार्जन शिक्षेमार्फत व्हावे, अशी समाजाची व गुन्हेगाराच्या दुष्कृत्याला नाहक बळी पडलेल्यांची अपेक्षा असते. शिक्षा म्हणजे पापक्षालन, शिक्षा म्हणजे गुन्ह्याच्या दुष्कृत्याचा बदला, शिक्षा म्हणजे निरपराध्यांना दहशत, शिक्षा म्हणजे चुकलेल्याला सुधारणे, शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला सामाजिक रोगी समजून उपचार करणे, इत्यादी विविध दृष्टिकोनांतून शिक्षापद्धतींचा अवलंब झाला. गुन्हेगाराने शिक्षा भोगल्याने समाजावर काय परिणाम झाला आणि शिक्षेनंतर गुन्हेगाराचे समाजात काय होते, याचीही दखल दंडशास्त्रात घेतली पाहिजे, असा आधुनिक विचार पुढे येत आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यासाला वर्तमान समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे. मात्र भारतात आरोपीला तुरुंगात कॉडून सोडून देण्यापलीकडे काही केले जात नाही.

अनेक आरोपींना शिक्षेची खरोखर भीती नसते. शिक्षेमुळे गुन्हेगारास आपण एकाकी पडल्याची भावना होते. तो समाजाचा शत्रू बनतो. यामुळेही तो इतर गुन्हेगारांत सहानुभूती शोधतो अथवा मनोविकृतीला बळी पडतो. गुन्हेगाराचे समाजात पुनर्वसन होणे इष्ट असेल, तर त्याला एकाकी पडल्याची भावना होणे घातक आहे. शिक्षेमुळे गुन्हेगारात झालेले काही बदल धोकादायक असतात. गुन्हेगारावर व्यक्ती म्हणून वैयक्तिक उपचार केले पाहिजेत; त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी समुदायाचा घटक आहे हे समजूनही उपचार केले पाहिजेत. त्याचा गुन्हेगारांशी संपर्क तुटेल व कायदा व नीतीची कदर करण्यास तो प्रवृत्त होईल, अशी योजना अपेक्षित असते. एकंदरीत आढावा घेता, शिक्षेच्या दहशतीने अथवा सुधारणेच्या उपचाराने गुन्हेगारी कमी होत नाही, असे दिसून आले आहे. त्यासाठी गुन्हेगार ही एकाकी व्यक्ती म्हणून लक्षात न घेता ज्या समूहात तो वावरतो, त्या समूहाचीही सुधारणा व्हायला हवी.