भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अग्रभागी होते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही नुसती एकच काव्यपंक्ती उच्चारली तरी त्यातून सावरकरांची मातृभूमीविषयीची ओढ आणि प्रेम किती अगाध होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. सावरकर म्हणजे देश आणि मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणारे देशाचे अस्सल रत्न होते, हे कोण नाकारू शकेल? त्यांचे देशप्रेम, त्यांची देशसेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची हिंदुत्वावरील निष्ठा आणि त्यांचे ज्वलंत विचार व अनन्यसाधारण कार्य हे कोणत्याही मान-सन्मानापलीकडचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये शिवसेनेने एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठविण्याच्या अभियानाचा शुभारंभ शनिवारी केला. हे अभियान सावरकरांच्या पुढील महिन्यातील पुण्यतिथीपर्यंत राबविण्याचा संकल्पही करण्यात आला. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन शब्दातच त्यांचा उचित असा गौरव दडलेला आहे. जे भारताचेच रत्न आहे, हे अवघ्या विश्वाला ठाऊक आहे. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले तरच ते या देशाचे रत्न ठरतील असा याचा अर्थ होत नाही. ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण’ इतक्या अस्सल शब्दात आपल्या मातृभूमीबद्दलची भक्ती अभिव्यक्त करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न किताब देण्यासाठी कोणावर मागणी करण्याची वा अभियान राबविण्याची वेळ यावी, हेच देशाचे दुर्दैव मानायला हवे. खरे तर सावरकरांच्या प्रखर देशभक्तीला ‘भारतरत्न’ने अलंकृत करण्याची संधी शासनाने कधीच घ्यायला हवी होती. त्या किताबाने सावरकर या तेज:पुंज व्यक्तिमत्त्वात तसूभरही फरक पडणार नाही, याउलट त्या किताबाची खऱ्या अर्थाने उंचीच वाढणार आहे.
अभियान कशाला?
By admin | Updated: January 25, 2016 02:15 IST